बाईकवर फिरण्यासाठी निघालेल्या जर्मन पर्यटकाचा मृत्यू; स्थानिकांचे ऐकलं नाही अन् गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 20:22 IST2025-02-05T20:20:56+5:302025-02-05T20:22:46+5:30
तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये एका विदेशी पर्यटकाचा जंगली हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

बाईकवर फिरण्यासाठी निघालेल्या जर्मन पर्यटकाचा मृत्यू; स्थानिकांचे ऐकलं नाही अन् गमावला जीव
Elephant Attack: तामिळनाडूतील कोईम्बतूर जिल्ह्यातील वालपराईमध्ये बाइक रायडिंगचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या एका जर्मन नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. टायगर व्हॅलीतील रोडवर जंगली हत्तीच्या हल्ल्यात जर्मन पर्यटकाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये हत्ती जर्मन पर्यटकाला मारताना आणि फेकून देताना दिसत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पर्यटकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
तामिळनाडूतील कोइम्बतूरमधील वलपराई रेंजमधील टायगर व्हॅलीमधून मोटारसायकलवरून जात असताना हत्तीने केलेल्या हल्ल्यात ७७ वर्षीय जर्मन पर्यटक मायकेल जुर्सेन यांचा मृत्यू झाला. लोकांचे न ऐकता जुर्सेन यांनी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. हत्तीने रस्ता अडवल्यामुळे दोन्ही बाजूने वाहने थांबली होती. लोकांनी इशारा दिल्यानंतरही मायकेल जुर्सेन यांनी बाईक पुढे नेली आणि हत्तीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
मागून येणाऱ्या एका वाहनातील प्रवाशांनी हा व्हिडिओ शूट केला, ज्यामध्ये मायकेल जुर्सेन हे इतरजण थांबलेले असताना वेगाने पुढे जाताना दिसले. रस्त्याला इतर लोकांनी आपली वाहने हत्तीपासून सुरक्षित अंतरावर थांबवली होती. त्याचवेळी मायकेल जुर्सेन यांनी हत्तीपासून बचाव करण्यासाठी उजव्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्तीने मायकेल यांचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला. हत्तीने सोंड आणि दातांनी मायकेल आणि त्यांच्या बाईकला खाली पाडलं. त्यानंतर मायकेल जंगलात पळून गेले. हत्ती पुढे जात असल्याचे पाहताच मायकेल खाली उतरले आणि त्यांनी बाईकजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्तीने पुन्हा मायकेल यांच्यावर हल्ला केला आणि ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या घटनेनंतर मायकेल यांना आधी स्थानिक त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला.