चेन्नई - टीटीवी दिनाकरन यांचा पक्ष अम्मा मक्कल मुनेत्र कडगम (AMMK) यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील NDA युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. AMMK हा दुसरा घटक पक्ष आहे, ज्यांनी एनडीएची साथ सोडली आहे. याआधी अन्नाद्रमुकमधून निलंबित झालेले ओ पन्नीरसेल्वम यांनी त्यांचा पक्ष युतीतून बाहेर पडत असल्याचं सांगितले होते. काही लोकांच्या विश्वासघातामुळे हे पाऊल उचलावे लागले, आम्हाला विश्वास होता, ते बदलतील परंतु तसे झाले नाही असं दिनाकरन यांनी माध्यमांना सांगितले.
तामिळनाडू येथे NDA चे नेतृत्व अन्नाद्रमुक करत होते, २०२३ साली वेगळे झाल्यानंतर AIADMK यांनी एप्रिल २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीसोबत युती केली. AIADMK विशेषत: पलानीस्वामी यांनी AMMK ला युतीत घेण्यास विरोध केला होता. अमित शाह यांनी हस्तक्षेप करण्याची अपेक्षा होती, परंतु काही झाले नाही असा आरोप दिनाकरन यांनी केला. एकेकाळी भाजपाचे विश्वासू राहिलेले दिनाकरन यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय करून येत्या डिसेंबरमध्ये नवीन आघाडीबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी नुकतेच भाजपा युती सोडली. आता AMMK नेही भाजपाची साथ सोडली आहे. राज्यात तमिलर काची आणि टीवीके यांनी ते स्वतंत्र निवडणूक लढणार असं सांगितले होते. परंतु दिनाकरन एनडीएतून बाहेर पडल्याने आणि आघाडीसाठी दरवाजे खुले केल्याने राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अम्मा कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची आणि मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार निवडण्याचं आवाहन दिनाकरन यांनी केले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही बिनशर्त एनडीएत सहभागी झालो होतो. परंतु आता २०२६ ची निवडणूक तामिळनाडूचं भवितव्य ठरवणारी आहे. मागील ३-४ महिन्यांपासून आम्ही दिल्लीतून भाजपा नेतृत्व योग्य निर्णय घेईल अशी वाट पाहत होतो. परंतु तसे झाले नाही असा आरोप दिनाकरन यांनी भाजपावर केला. भाजपाची साथ सोडण्यापूर्वी दिनाकरन यांनी अभिनेता थलापती विजयचा पक्ष टीवीके २०२६ च्या निवडणुकीत प्रभाव टाकेल असं विधान केले होते.