विजय यांचा पक्ष NDAत येणार? तामिळनाडूत निवडणुकीपूर्वी चर्चांना उधाण, या राज्याचे उपमुख्यमंत्री बजावताहेत महत्त्वाची भूमिका    

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 21:44 IST2026-03-13T21:44:14+5:302026-03-13T21:44:45+5:30

Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून आघाड्यांचं गणित जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजय यांच्या टीव्हीके पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत.

Tamil Nadu Assembly Election 2026: Will Vijay's party TVK join NDA? Discussions heat up before the elections in Tamil Nadu, the Deputy Chief Minister of this state is playing an important role | विजय यांचा पक्ष NDAत येणार? तामिळनाडूत निवडणुकीपूर्वी चर्चांना उधाण, या राज्याचे उपमुख्यमंत्री बजावताहेत महत्त्वाची भूमिका    

विजय यांचा पक्ष NDAत येणार? तामिळनाडूत निवडणुकीपूर्वी चर्चांना उधाण, या राज्याचे उपमुख्यमंत्री बजावताहेत महत्त्वाची भूमिका    

तामिळनाडू विधानसभेची निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. यावेळी सत्ताधारी डीएमकेची आघाडी, प्रमुख विरोधी पक्ष असलेला एआयएडीएमके, भाजपा तसेच यावेळी नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा अभिनेते विजय यांचा टीव्हीके पक्ष यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून आघाड्यांचं गणित जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजय यांच्या टीव्हीके पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच यामध्ये एका राज्याचे उपमुख्यमंत्री महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची चर्चा सुरू आहे.

तामिळनाडूच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती पाहता टीव्हीके पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्यास राज्याच्या राजकारणावर त्याचा फार मोठा प्रभाव पडू शकतो. विजय यांनी टीव्हीके या पक्षाची स्थापना केल्यापासून ते तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले आहेत. तामिळनाडूमधील निवडणुकांमध्ये नेहमीच कमी मताधिक्याने जय पराजयाचा फैसला होण्याचा कल दिसून येतो. त्यामुळे विजय यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला तर थोड्याशा मतांचा फरक पडला तरी निकाल बदलू शकतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा वेगवेगळ्या माध्यमातून विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये वेगवेगळे नेते मध्यस्थी करत असून, त्यात एका राज्याचे उपमुख्यमंत्रीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. मात्र सध्यातरी ही चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. मात्र या आघाडीबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच विजय यांचा पक्ष एनडीएत आल्यास त्यामुळे होणाऱ्या राजकीय नफा नुकसानीचा अंदाज बांधला जात आहे.

अभिनेते विजय यांचा दक्षिणेमध्ये आणि विशेषकरून तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. तसेच या चाहत्यांची थोडीशी मते जरी त्यांच्या माध्यमातून वळवता आली तर आपला फायदा होऊ शकतो, हे भाजपाने हेरले आहे. त्यामुळेत विजय यांच्या पक्षाला एनडीएमध्ये आणण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.  

Web Title: Tamil Nadu Assembly Election 2026: Will Vijay's party TVK join NDA? Discussions heat up before the elections in Tamil Nadu, the Deputy Chief Minister of this state is playing an important role