तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमधील जागावाटपाचा तिढा सुटला, दोघेही एवढ्या जागांवर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:20 IST2026-03-04T16:01:24+5:302026-03-04T16:20:54+5:30
Tamil Nadu Assembly Election 2026: अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डीएमकेने जागावाटपातील तिढा सोडवला आहे.

तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमधील जागावाटपाचा तिढा सुटला, दोघेही एवढ्या जागांवर लढणार
अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्येइंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डीएमकेने जागावाटपातील तिढा सोडवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी फोनवरून संवाद साधत चर्चा करून आघाडी आणि जागावाटपाला अंतिम स्वरूप दिले. या जागावाटपानुसार काँग्रेस तामिळनाडूमध्ये एकूण २८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. सोबतच काँग्रेसला राज्यसभेची एक जागा देण्याचेही डीएमकेने मान्य केले आहे.
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने यावेळी ३५ जागांची मागणी केली होती. मात्र डीएमकेने काँग्रेसला २५ हून अधिक जागा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि डीएमकेमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू होती. दरम्यान, आज होळीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना फोन करून चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी जागावाटपाबाबत विचारविनिमय केला. त्यावेळी डीएमकेने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत २८ जागा आणि सोबत राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन दिले.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये डीएमकेने काँग्रेसला २५ जागा दिल्या होत्या. त्यात काँग्रेसने १८ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी काँग्रेसने विधानसभेच्या ३५ जागांसह राज्यसभेच्या २ जागांची मागणी केली होती. मात्र आपण काँग्रेसला विधानसभेच्या २५ जागा आणि राज्यसभेच्या एका जागेपेक्षा अधिक काही देऊ शकत नाही, असे डीएमकेने स्पष्ट केले होते. तसेच हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे आता काँग्रेसने ठरवावे, असे डीएमकेने स्पष्ट केले होते. मात्र आज काँग्रेस आणि डीएमकेमधील जागावाटपाला अंतिम स्वरूप आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांचे बळ वाढले आहे.