शाळेच्या बसमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद; विद्यार्थ्यांच्या हाणमारीने घेतला एकाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:22 IST2025-02-11T14:21:04+5:302025-02-11T14:22:42+5:30
तमिळनाडूमध्ये क्षुल्लक वादातून एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शाळेच्या बसमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद; विद्यार्थ्यांच्या हाणमारीने घेतला एकाचा जीव
Crime News: शाळकरी मुलांमध्ये वर्गात किंवा शाळेच्या आवारात वाद होणं ही किरकोळ गोष्ट असते. पण गेल्या काही काळापासून शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये रागाचं प्रमाण वाढत चालल्याचे पाहायला मिळतंय. मात्र या भांडणातून नकळत एखाद्याच्या जीव देखील जाऊ शकतो. असाच काहीसा प्रकार तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात घडला. शाळेच्या बसमध्ये क्षुल्लक कारणावरुन दोन शाळकरी मुलांमध्ये जे काही घडले त्याने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.
तमिळनाडूत शाळेच्या बसमधील सीटवरून झालेल्या किरकोळ वादाने धक्कादायक वळण घेतलं. बसच्या सीटवरुन वर्गमित्राशी झालेल्या भांडणात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. संध्याकाळी जेव्हा नववीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या बसमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेलं. त्यातच एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शाळेच्या बसमध्ये सीटवरून या दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. यावेळी एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला एवढ्या जोरात धक्काबुक्की केली की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सकाळी मुलाला वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. सालेम पोलिसांनी हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडले असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झारखंडच्या रांचीमध्ये असाच एक प्रकार घडला होता. झारखंडमधील एका शाळेत सहावीच्या दोन मुलांमध्ये हाणामारी झाली. यानंतर एका विद्यार्थ्याने त्यांच्यावर कात्रीने हल्ला केला. त्यामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर ४० मिनिटे शाळेने मुलाला रुग्णालयात पाठवले नाही. त्यानंतर कुटुंबियांनी जखमी मुलाला रुग्णालयात नेऊन उपचार केले. ही घटना वर्गात सर्व मुलांसमोर घडली. दुसऱ्या विद्यार्थ्याने आमच्या मुलावर मागून कात्रीने हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर वार केले. यावेळी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुलाच्या हातालाही गंभीर दुखापत झाली.