t shirt and caps can be made by crushing water bottles in 2250 railway stations | प्लास्टिक बॉटल्सपासून टी-शर्ट तयार करणार, रेल्वे स्थानकांवर मशीन लावणार

प्लास्टिक बॉटल्सपासून टी-शर्ट तयार करणार, रेल्वे स्थानकांवर मशीन लावणार

ठळक मुद्देरेल्वे स्थानकावर फेकण्यात आलेल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्सच्या मदतीने आता टी-शर्ट आणि कॅप तयार करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांवर बॉटल क्रशर मशीन बसवण्यात येणार आहेत. 2250 रेल्वे स्थानकावर दररोज 300 बाटल्सप्रमाणे जवळपास 7 लाख बॉटल्स क्रश करण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली - प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक ठिकाणी प्लास्टिकबंदी करण्यात आली आहे. पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी छत्तीसगडमध्ये काही दिवसांपूर्वी एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात नागरिकांना मोफत जेवण देण्याचा चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यानंतर आता रेल्वेही पाण्याच्या प्लास्टिक बॉटलचा योग्य उपयोग करणार आहे. रेल्वे स्थानकावर फेकण्यात आलेल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्सच्या मदतीने आता टी-शर्ट आणि कॅप तयार करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्सचा अनेकदा रेल्वे स्थानकावर खच पाहायला मिळतो. पिण्याचे पाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्लास्टिकची बॉटल वापरतात. मात्र आता या बॉटल्स क्रश करून त्यापासून टी-शर्ट आणि कॅप तयार करण्यात येणार आहेत. 

पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्सपासून पूर्व मध्य रेल्वे आता टी-शर्ट तयार करणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकांवर बॉटल क्रशर मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनच्या मदतीने क्रश झालेल्या प्लास्टिकपासून टी-शर्ट तयार करण्यात येणार आहे. सर्व ऋतुमध्ये हे टी-शर्ट वापरता येणार असून रेल्वेने यासाठी मुंबईच्या एका कंपनीसोबत करार केला आहे. लवकरच प्लास्टिक बॉटलपासून तयार करण्यात आलेले टी-शर्ट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.  

झारखंड येथील रांचीमध्ये अशाच प्रकारे तयार करण्यात आलेल्या टी-शर्टचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या टी-शर्टला लोकांनी चांगली पसंती दर्शवली. त्यामुळेच प्लास्टिकपासून टी-शर्ट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात असेलल्या प्लास्टिक कचऱ्याचा योग्य वापर करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे. यासाठी देशातील 2250 रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन लावण्यात येणार आहे. या प्रयोगाअंतर्गत 2250 रेल्वे स्थानकावर दररोज 300 बाटल्सप्रमाणे जवळपास 7 लाख बॉटल्स क्रश करण्यात येणार आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कचरा द्या अन् पोटभर जेवा; तुम्हालाही वाटेल 'या' अनोख्या कॅफेचा हेवा

छत्तीसगडमध्ये भारतातील पहिला Garbage Cafe तयार करण्यात आला आहे. एक किलो प्लास्टिकच्या मोबदल्यात लोकांना मोफत जेवण मिळणार आहे. यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अंबिकापूर महानगर पालिकेच्या वतीने गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहावे तसेच प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एक किलो प्लास्टिक गोळा करून आणले तर त्या मोबदल्यात नागरिकांना मोफत जेवण मिळणार आहे. तसेच 500 ग्रॅम प्लास्टिक कचरा आणणाऱ्या लोकांना या कॅफेमध्ये नाष्टा देण्यात येणार आहे. गार्बेज कॅफेमध्ये नागरिकांना मोफत जेवण मिळणार असल्याने सर्वत्र या कॅफेचं कौतुक होत आहे. 

आता सीटसाठीची भांडणं संपणार; ट्रेनमध्ये बायोमेट्रिक येणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण यासर्व गोष्टींपासून प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे. विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करण्यासाठी लवकरच बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता इतर ट्रेनमध्ये देखील बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाल्यानंतर बायोमॅट्रीक मशीनचा वापर केल्यानंतर प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवाशांचा प्रवास उत्तम व्हावा यासाठी महत्त्वाच्या निर्णय घेण्यात येतील असं सांगितलं होतं. बायोमॅट्रीक तंत्रज्ञानामुळे रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. मुंबईतील चार रेल्वे स्थानकावर बायोमॅट्रीक मशीन लावण्यात आली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यानंतर आता आणखी काही ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये बायोमॅट्रीक सुविधा लागू करण्याची तयारी केली जात आहे.

 

Web Title: t shirt and caps can be made by crushing water bottles in 2250 railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.