नाश्त्यावर यथेच्छ ताव मारून काँग्रेस नेत्यांचे लाक्षणिक उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:40 IST2018-04-09T15:40:00+5:302018-04-09T15:40:00+5:30
काँग्रेसने देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. त्यानुसार देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. मात्र राजनाधी नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी...

नाश्त्यावर यथेच्छ ताव मारून काँग्रेस नेत्यांचे लाक्षणिक उपोषण
नवी दिल्ली - काँग्रेसने देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. त्यानुसार देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. मात्र राजनाधी नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी हॉटेलमध्ये नाश्त्यावर भरपेट ताव मारून नंतर उपोषणाला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे दिल्लीतील दिग्गज नेते हॉटेलमध्ये यथेच्छ ताव मारत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दलितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात आज करण्यात आलेल्या आंदोलानामध्ये काँग्रेसची प्रतिमा उंचावण्याऐवजी पक्षाला अडचणीत आणणाऱ्या घटनाच अधिक घडल्या. एकीकडे शीख दंगलीतील आरोपी जगदीश टाइटलर आणि सज्जन सिंह राजपथावर आल्याने त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नियोजित वेळेपेक्षा फार उशिरा आल्याने त्यावरूनही चर्चा रंगली होती. हे कमी म्हणून की काय उपोषणापूर्वी काँग्रेसचे नेते नाश्त्यावर ताव मारत असल्याचे फोटो व्हायरल झाल्याने काँग्रेसचे आजचे उपोषण उपहासाचा विषय बनले. या छायाचित्रांमध्ये काँग्रेसचे नेते अरविंदर सिंह लवली आणि हारुन युसूफ छोटे भटूरे खाताना दितस आहेत. तर त्यांच्यासोबत अजय माकन आणि इतर नेतेही असल्याचे दिसत आहे.
भाजपा नेते मदनलाला खुराणा यांचे पुत्र हरिश खुराणा यांनी एक फोटो ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे."तिकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजघाटावर उपोषणाला बोलावून काँग्रेसचे नेते नाश्त्यावर ताव मारत आहेत. लोकांना चांगलं मुर्ख बनवताय." तर मनोज तिवारी यांनीही काँग्रेस नेत्यांना काही वेळ सुद्धा उपाशी राहता येत नाही असा टोला लगावला आहे.
वहाँ रे हमारे कांग्रिस के नेता,लोगों को राज घाट पर अनशन के लिए बुलाया है और ख़ुद एक रेस्तराँ में बैठ कर छोले भटूरे के मज़े ले रहे हो ।
— Harish Khurana (@HarishKhuranna) April 9, 2018
सही बेफ़क़ूफ बनाते हो । pic.twitter.com/gp2pIYsdOb
दरम्यान, काँग्रेस नेते अरविंदर सिंह यांनी सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता केल्याचे मान्य केले आहे. मात्र मुख्य मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपा नको ते मुद्दे समोर आणत आहे अशी टीका त्यांनी केली आहे." आजचे उपोषण सांकेतिक होते. त्याची वेळी सकाळी 10.30 होती मग त्याआधी आम्ही काय करत होतो आणि आणि काय नाही याच्याशी बाकीच्यांचा संबंध नाही," असे ते म्हणाले.