Operation Sindoor: दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन केले जाणार नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित केले आहे, थांबवलेले नाही. पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या, तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले. पहलगाम हल्ला, भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’, यानंतर घडलेल्या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. परंतु, यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर काही हालचाली दिसल्या. काही संशयित ड्रोन आढळून आल्याचे सांगितले गेले. आता मात्र सीमेवर शांतता आहे. ड्रोन आढळून आलेले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांचे देशाला संबोधन झाल्यानंतर सोमवारी रात्री जम्मू प्रदेशातील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा दल संशयास्पद ड्रोन आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करत असल्याचे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. जम्मू आणि काश्मीरमधील सांबाजवळ काही प्रमाणात संशयास्पद ड्रोन आढळून आले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले.
खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद
इंडिगो कंपनीने अमृतसरसह अन्य पाच ठिकाणी जाणारी विमाने रद्द केल्याची माहिती मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंजाबमधील अमृतसर येथे ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. दसुया आणि मुकेरियन भागात काही काळासाठी खबरदारी म्हणून अंशतः वीजपुरवठा बंद करण्याची घोषणा करत आहोत. होशियारपूरच्या रहिवाशांना आवाहन करत आहोत की, त्यांनी स्वतःहून वीजपुरवठा बंद करावा आणि घरातच राहावे. घाबरण्याचे काही कारण नाही, असे होशियारपूरच्या उपायुक्त आशिका जैन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबमधील जालंधरमध्ये सशस्त्र दलांनी 'पाळत ठेवणारा ड्रोन' पाडला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच युद्धबंदीची परिस्थिती कायम असल्याचेही सांगितले जात आहे. जम्मू, सांबा, अखनूर आणि कठुआ येथे सुरुवातीला ड्रोन दिसल्यानंतर भारतीय लष्कराने कोणतेही ड्रोन दिसले नसल्याचे पुष्टी केली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांमधील चर्चेच्या वृत्तानंतर, दोन्ही बाजूंनी परस्पर वचनबद्धता पाळली जात आहे की, गोळीबार करू नये किंवा एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक आणि शत्रुत्वाची कारवाई करू नये, असे सूत्रांनी सांगितले.