"मला बलात्कार व जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", नुपूर शर्मा यांची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 20:12 IST2022-07-18T20:11:38+5:302022-07-18T20:12:08+5:30
Prophet Remarks Row: नुपूर शर्मा यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

"मला बलात्कार व जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", नुपूर शर्मा यांची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांनी आपल्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला ट्रान्सफर करण्याची विनंती केली आहे.
नुपूर शर्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, याआधी माझी मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले होते. माझ्या जीवाला आणखी धोका वाढला आहे. मला बलात्कार आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जमशेद पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले. त्यांच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्स बजावले आहे. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.
याआधीही नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले दिल्लीत ट्रान्सफर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्यावर कडक टिप्पणी केली होती. वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात पसरलेल्या जातीय हिंसाचाराला नुपूर शर्माच जबाबदार आहेत. नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी याचिका मागे घेतली.
नुपूर शर्मा यांनी नवीन याचिकेत काय म्हटले?
सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर नुपूर शर्मा यांनी आता असा युक्तिवाद केला आहे की, त्यांना असामाजिक तत्वांकडून पुन्हा बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यापूर्वीच्या याचिकेत त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे सांगितले होते. त्यांच्याविरोधात दिल्लीत पहिली एफआयआर नोंदवण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत.