पत्नीसोबत अफेअरचा संशय, इंजिनियरने यूट्यूबवर पाहून बनवला बॉम्ब, बिल्डरच्या कारमध्ये केला ब्लास्ट, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:46 IST2025-01-30T12:46:16+5:302025-01-30T12:46:43+5:30
Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील भिलाई येथे एका सॉफ्टवेअर इंजिनियरने पत्नीचे बिल्डरसोबत अफेअर सुरू असल्याच्या संशयावरून धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आलं आहे. या सॉफ्टवेअर इंजिनियरने या बिल्डरला घाबरवण्यासाठी युट्युबवरून बॉम्ब तयार करण्याचं तंत्र शिकून घेतलं.

पत्नीसोबत अफेअरचा संशय, इंजिनियरने यूट्यूबवर पाहून बनवला बॉम्ब, बिल्डरच्या कारमध्ये केला ब्लास्ट, नंतर...
छत्तीसगडमधील भिलाई येथे एका सॉफ्टवेअर इंजिनियरने पत्नीचे बिल्डरसोबत अफेअर सुरू असल्याच्या संशयावरून धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आलं आहे. या सॉफ्टवेअर इंजिनियरने या बिल्डरला घाबरवण्यासाठी युट्युबवरून बॉम्ब तयार करण्याचं तंत्र शिकून घेतलं. त्यानंतर बिल्डरच्या डस्टर कारमध्ये रिमोटच्या मदतीने स्फोट घडवून आणला. आता पोलिसांनी आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली असून, त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जवाहरनगर, भिलाई येथे राहणाऱ्या संजय बुंदेला यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्या म्हटले आहे की,’’माझं कौशल बिल्डकॉन नावाचं ऑफिस आहे. या ऑफिससमोर माझी डस्टर कार उभी होती. त्यामध्ये कुणीतरी स्फोटक वस्तूच्या मदतीने स्फोट घडवून आणला’’.
त्यानंतर या प्रकरणी सुपेला पौलीस ठाण्याच्या स्मृतिनगर चौकीमध्ये गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एक संशयास्पद व्यक्ती दिसली. तसेच त्या व्यक्तीची शरीरयष्टी ही कौल बिल्डकॉन ऑफिसमध्ये काम करत असलेल्या असिस्टंट मॅनेजरचा पती दैवेंद्र सिंह याच्याशी मिळती जुळती असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी देवेंद्र याला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.
पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या देवेंद्र याने घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देत गुन्हा कबुल केला. बिल्डर संजय बुंदेला याचे माझ्या पत्नीसोबत असलेल्या कथित अफेअरच्या संशयामुळे मी हे कृत्य घडवले, असे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच बिल्डरला घाबरवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचेही कबूल केले.
युट्युबवर व्हिडीओ पाहून आपण बॉम्ब बनवल्याचे आणि त्यासाठी आपल्या मुलाच्या खेळण्याच्या रिमोटचा वापर केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. हा बॉम्ब डस्टर गाडीत लावून तिच्यामध्ये स्फोट घडवल्याचेही त्याने कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी देवेंद्र याला अटक करून कोर्टात हजर केले. तिथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.