विमानतळ अधिकाऱ्यांच्या कामावर सुप्रीम कोर्ट नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:36 IST2025-10-19T12:36:31+5:302025-10-19T12:36:31+5:30
डीएनए तपासणीत ते शिंग रेनडिअरचे असल्याचे स्पष्ट झाले.

विमानतळ अधिकाऱ्यांच्या कामावर सुप्रीम कोर्ट नाराज
नवी दिल्ली : कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवाशाला ताब्यात घेणे किंवा अटक करणे यांसारखे कठोर पाऊल उचलताना चूक होऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील कामकाज पाहणाऱ्या संस्थांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना विद्यमान कायद्यांबाबत संवेदनशील करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवताना रॉकी अब्राहम नामक एका अनिवासी भारतीय व्यक्तीची (एनआरआय) अटक आणि त्याच्याविरोधातील फौजदारी खटला रद्द केला. अब्राहम हे गेली २० वर्षे इटालीत स्थायिक आहेत. जानेवारी २०२५ मध्ये दिल्ली विमानतळावर त्यांच्या बॅगेत हरणाचे शिंग सापडल्याने त्यांना वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत अटक करण्यात आली होती.
डीएनए तपासणीत ते शिंग रेनडिअरचे असल्याचे स्पष्ट झाले. रेनडिअरचे शिंग बाळगणे भारतीय वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा नाही. तरीही अब्राहम यांना दोन आठवडे तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांना भारत सोडण्यासही बंदी घालण्यात आली होती. घाईघाईने घेतलेल्या या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.