SC on War Prisoner: भारतीय सैन्यातील मेजर 1971 पासून पाकिस्तानच्या कैदेत; सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:48 IST2022-04-13T16:48:45+5:302022-04-13T16:48:58+5:30
SC on War Prisoner: कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या कॅप्टन सौरव कालिया आणि पाच जवानांचा छळ आणि हत्या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

SC on War Prisoner: भारतीय सैन्यातील मेजर 1971 पासून पाकिस्तानच्या कैदेत; सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर...
नवी दिल्ली: आपल्यापैकी अनेकांना पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबद्दल माहिती आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर येत असतात. पण, भारतीय सैन्यातील एक मेजर मागील 50 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे. त्यांच्याबद्दल आपल्यापैकी फार क्वचित लोकांना माहिती असेल. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकरणावर उत्तर देण्यास सांगितले आहे.
1971 पासून पाकिस्तानच्या ताब्यात
सर्वोच्च न्यायालयात मेजर कंवलजीत सिंग (Major Kanwaljit Singh) यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले आहे. मेजर कंवलजीत सिंग 1971 च्या भारत-पाक युद्धापासूनयुद्धकैदी म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत.
बेकायदेशीरित्या पाकच्या कैदेत
मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नीने अर्ज दाखल करून म्हटले की, मेजर सिंग यांना युद्धकैदी म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसच्या युद्धकैद्यांची यादी सादर करावी, असेही अर्जात म्हटले आहे. या यादीनुसार युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतलेले मेजर सिंग मायदेशी परतणार होते, मात्र पाकिस्तानने त्यांना आतापर्यंत बेकायदेशीर नजरकैदेत ठेवले आहे.
इतर कैद्यांची छळ करुन हत्या
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावली असून उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, 50 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. कारगिल युद्धादरम्यान युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतलेल्या कॅप्टन सौरव कालिया आणि पाच जवानांचा छळ आणि हत्या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.