नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं वाहनांच्या विक्रीसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. 1 एप्रिल 2020 पासून देशात बीएस-4 श्रेणीतील कोणत्याही वाहनाची विक्री आणि नोंदणी होणार नाही, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बीएस-4 हे एक उत्सर्जन मानक आहे. याआधी न्यायालयानं बीएस-3 श्रेणीतील वाहनांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. भारत स्टेज इमिशन स्टँडर्डची (बीएसईएस) रचना भारत सरकारनं केली आहे. या माध्यमातून गाडीतून निघणाऱ्या धुरामधून होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण मोजलं होतं. त्यानुसार त्या वाहनाचं वर्गीकरण विविध श्रेणींमध्ये केलं जातं. 2000 साली या मानकांची अंमलबजावणी सर्वप्रथम करण्यात आली. वाहनातून होणारं प्रदूषण कमी व्हावं, यासाठी बीएसईएसची रचना करण्यात आली. भारत स्टेज लागू करण्यात आल्यानंतर सर्व वाहन कंपन्यांना त्याचं पालन करावं लागतं. ऑक्टोबर 2010 मध्ये देशात बीएस-3 लागू करण्यात आला. यानंतर देशातील 13 प्रमुख शहरांमध्ये एप्रिल 2010 पासून बीएस-4 लागू झाला. मात्र संपूर्ण देशात बीएस-4 2017 पासून लागू करण्यात आला. 2020 पासून संपूर्ण देशात बीएस-5 ऐवजी बीएस-6 लागू केला जाईल, अशी घोषणा सरकारनं 2016 मध्ये केली होती.
1 एप्रिल 2020पासून देशात 'या' वाहनांच्या विक्रीवर बंदी; सुप्रीम कोर्टाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 13:27 IST