नीट परीक्षा रद्द करण्याबाबतच्या नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:04 AM2020-09-10T00:04:52+5:302020-09-10T07:08:58+5:30

सर्व मुद्यांचे निराकरण झाले आहे

The Supreme Court rejected the new petition seeking cancellation of the examination | नीट परीक्षा रद्द करण्याबाबतच्या नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नीट परीक्षा रद्द करण्याबाबतच्या नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

Next

नवी दिल्ली : देशामध्ये १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नीट परीक्षा कोरोना साथीमुळे पुढे ढकलाव्यात किंवा रद्द कराव्यात, अशी विनंती करणाऱ्या नव्या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. नीट परीक्षेविषयीच्या सर्व मुद्द्यांचे आता निराकरण झाले आहे, असे सांगत न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या याचिका सादर करण्यात आल्या होत्या.

नीट परीक्षेबाबत बिगरभाजप सरकार असलेल्या सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सादर केलेल्या याचिकेसह काही याचिका सर्वोच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी फेटाळल्या होत्या. नीट परीक्षा होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी एका आदेशाद्वारे मार्ग मोकळा करून दिला होता. या आदेशाचा फेरविचार करावा, अशी विनंती सहा राज्यांच्या मंत्र्यांनी आपल्या याचिकेत केली होती. त्यानंतर नीट परीक्षेबाबत सादर झालेल्या नव्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने म्हटले की, नीट परीक्षा व्यवस्थित पार पडावी म्हणून संबंधित यंत्रणेने चोख व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आता त्याबाबतच्या आक्षेपांचे निराकरणही झाले आहे. मूळ मुद्दा निकाली निघाला असल्याने नीट परीक्षेसंदर्भातील कोणतीही याचिका विचारात घेतली जाणार नाही.

बिहारमध्ये दोनच शहरांत परीक्षा केंद्रे

याचिकादारांतर्फे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी बिहारमधील परिस्थिती विशद केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये नीट परीक्षेसाठी फक्त गया व पाटणा या दोन शहरांतच परीक्षा केंद्रे आहेत. ही परीक्षा काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी.

आणखी एका याचिकादारातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ के. टी. एस. तुलसी म्हणाले, कंटेनमेन्ट झोनमधील लोकांना घराबाहेर जाण्यासही परवानगी देण्यात येत नाही. मग त्या भागांमध्ये राहणारे विद्यार्थी कसे काय परीक्षा देऊ शकतील?

Web Title: The Supreme Court rejected the new petition seeking cancellation of the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.