अयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 12:09 IST2018-11-12T11:20:55+5:302018-11-12T12:09:59+5:30
लवकर सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

अयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. यानंतर या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली.
Supreme Court has rejected plea seeking early hearing in Ayodhya title suit in connection with Ram Janmabhoomi Babri Masjid case. pic.twitter.com/JHRmEqtdU6
— ANI (@ANI) November 12, 2018
अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारत हिंदू महासभेनं दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी तातडीनं होणं गरजेचं असल्याचं महासभेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. मात्र त्यांची मागणी न्यायालयानं मान्य केली नाही. या प्रकरणात आपण आधीच आदेश दिलेले आहेत, असं म्हणत न्यायालयानं महासभेची याचिका फेटाळून लावली. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी केवळ तीन मिनिटं सुनावणी घेतली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी 2019 नतर होईल, असं न्यायालयानं त्यावेळी म्हटलं होतं.