"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:09 IST2025-02-03T19:08:46+5:302025-02-03T19:09:07+5:30
भाजपच्या खासदाराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिकाकर्त्याला पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले.

"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका
Supreme Court: मध्य प्रदेशच्या खांडवा-बुऱ्हाणपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान व्यवसायाने वकील असलेले अपक्ष उमेदवार मनोजकुमार अग्रवाल यांनी खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्याविरोधात जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सत्य लपवून खोटी माहिती दिली आहे, असे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटलं होतं. जबलपूर हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही सर्वोच्च न्यायालयाने अग्रवाल यांची याचिका फेटाळत त्यांना सल्ला दिला.
खांडवा येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अपक्ष उमेदवार मनोज कुमार अग्रवाल यांची याचिका फेटाळताना पुढील निवडणुकीची तयारी करा असा सल्ला दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांचा संदर्भ देत याचिकाकर्त्याला तुम्ही खासदार होऊनही वकिली करु शकता असं म्हटलं.
गेल्या वर्षी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मनोज कुमार अग्रवाल यांची याचिका सुनावणीस योग्य नसल्याचे म्हणत फेटाळली होती. ज्ञानेश्वर पाटील हे मध्य प्रदेश पॉवरलूम विव्हर्स कोऑपरेटिव्ह युनियन, बुरहानपूरचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांनी उमेदवारी अर्जात याबाबत योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार नरेंद्र पटेल यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी याचिकाकर्ते मनोजकुमार अग्रवाल यांनी केली होती.
उच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी योग्य नसल्याचे ठरवत फेटाळली होती. यंत्रमाग विणकर सहकारी संघ राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो की नाही हे याचिकाकर्त्याला स्पष्ट करता आलेले नाही. तसेच २०२० मध्ये जेव्हा ज्ञानेश्वर पाटील अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हा ते भ्रष्टाचारामुळे होते की अन्य काही कारणांमुळे होते हे या याचिकेतून स्पष्ट झालेले नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.
उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मनोज कुमार अग्रवाल सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याने पुढील निवडणुकीची तयारी करावी, असे सांगितले. "भाजप उमेदवाराला ८ लाखांहून अधिक मते मिळाली आणि तुम्हाला ४००० मतं मिळाली. त्यामुळे पुढच्या निवडणुकीची तयारी करा," असं सर्वोच्च न्यायलयाने सांगितले.
"वकिलांकडे अशीही सोय आहे की ते खासदार झाल्यानंतरही वकिली सुरू ठेवू शकतात. तुम्ही कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांना बघा. पुढील निवडणुकांसाठी आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत," असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं.