"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:47 IST2025-12-26T15:45:53+5:302025-12-26T15:47:51+5:30
एका मॉलमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींनी समाजाची पर्वा न करता लग्न केलं.

"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्रिवेणीगंज नगर परिषद क्षेत्रातील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींनी समाजाची पर्वा न करता लग्न केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लग्नात त्यांनी चुलीला साक्षी मानून सप्तपदी घेतल्या आहेत. या अनोख्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रेमकथेची सुरुवात साधारण दोन वर्षांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्राम'च्या माध्यमातून झाली होती. मधेपुरा जिल्ह्यातील पूजा गुप्ता (२१ वर्षे) आणि काजल कुमारी (१८ वर्षे) यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. गेल्या दोन महिन्यांपासून या दोघी त्रिवेणीगंजमधील वॉर्ड क्रमांक १८ मध्ये एका भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होत्या आणि मॉलमध्ये एकत्र काम करत होत्या.
मंगळवारी रात्री उशिरा या दोघींनी गुपचूप त्रिवेणीगंज मेळा मैदानातील एक मंदिर गाठलं. तिथे त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्नाचे विधी पूर्ण केले. या अनोख्या लग्नात पूजा गुप्ताने 'नवरदेवाची' भूमिका बजावली, तर काजल कुमारी 'नवरी' बनली. लग्नानंतर त्यांनी आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच, तो काही वेळातच संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला.
बुधवारी सकाळी ही बातमी परिसरात पसरताच लोकांची मोठी गर्दी जमली. मीडिया आणि स्थानिक लोकांशी बोलताना दोन्ही तरुणींनी आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या की, "आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही. आमचं हे नाते पूर्णपणे भावनिक आहे." त्यांनी आपलं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं आहे. एकमेकींची साथ आपल्यासाठी अधिक महत्त्वाची असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.