दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा, पत्नीचा मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 14:43 IST2024-03-27T14:42:22+5:302024-03-27T14:43:28+5:30
Sunita Arvind Kejriwal AAP : सुनीता केजरीवाल यांनी व्हिडिओ जारी करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांबाबत मोठा दावा केला आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा, पत्नीचा मोठा दावा...
Sunita Arvind Kejriwal AAP : दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित मनी लॉड्रिंगप्रकणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात दिले आहे. ED सतत त्यांची चौकशी करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. मद्य घोटाळा काय आहे आणि या घोटाळ्यातील पैसा कुठे गेला? याचा खुलासा स्वतः अरविंद केजरीवाल 28 मार्च रोजी न्यायालयात करणार असल्याची माहती सुनीता यांनी दिली.
सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुनीता केजरीवाल म्हणतात, ED ने गेल्या दोन वर्षांत या तथाकथित मद्य घोटाळ्याप्रकरणी 250 हून अधिक छापे टाकले, पण त्याच्याशी संबंधित एकही पैसा जप्त केलेला नाही. मनीष सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांच्यासह आमच्या घरात छापेमारी केली, पण काहीच सापडले नाही. मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय चूक केली, ते मला सांगा? या लोकांना दिल्लीतील जनतेचा नाश करायचा आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
So called शराब घोटाले का पैसा कहाँ है, इसका ख़ुलासा कल कोर्ट में करेंगे CM @ArvindKejriwal l Smt. @KejriwalSunita Addressing an Important Press Conference l LIVE https://t.co/KZKMnbOuU0
— AAP (@AamAadmiParty) March 27, 2024
सुनीता केजरीवाल पुढे म्हणाल्या, काल(दि.26) मी त्यांना भेटायला गेले होते, त्यांची शुगर लेव्हल खाली आली आहे, तरीदेखील ते काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांना पत्र लिहून लोकांच्या पाणी आणि गटार समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते. अरविंदजी हे सच्चे देशभक्त आणि धाडसी व्यक्ती आहेत. अरविंदजी मला म्हणाले की, माझे शरीर तुरुंगात आहे, पण माझा आत्मा दिल्लीतील जनतेसोबत आहे.
भाजपकडून चौकशीची मागणी
दुसरीकडे भाजपच्या दिल्लीतील शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस आयुक्त संजय अरोरा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कोठडीतून मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ईडीच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीकडून अशी पत्रे कशी येऊ शकतात, असा प्रश्न त्यांनी केला. माझ्या माहितीप्रमाणे ही पत्रे बनावट आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.