करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:29 IST2025-12-08T17:29:19+5:302025-12-08T17:29:57+5:30
अपघातात सुनीलने आपले दोन्ही हात कायमचे गमावले. त्यानंतर त्याचे वडील आणि मोठी बहीण यांचंही निधन झालं. कुटुंब या धक्क्यातून सावरलं नाही.

करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
जेव्हा आयुष्य सर्वात मोठी परीक्षा घेतं तेव्हा काही लोक हार मानतात, तर काही इतिहास घडवतात. कोटाचा पॅरा-एथलीट सुनील साहू त्यापैकी एक आहे. २०१२ मध्ये झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतरही, सुनीलने धावणे, उडी मारणं, आयुष्य सोपं करून जगणं सुरूच ठेवलं. आज त्याच्या नावावर एकूण १८ मेडल आहेत, ज्यात ११ गोल्ड, २ सिल्व्हर आणि २ ब्रॉन्झचा समावेश आहे.
अलवर जिल्ह्यातील मालाखेडा येथील रहिवासी असलेल्या सुनीलच्या वडिलांच्या आईस्क्रीम फ्रॅक्ट्रीत २०१२ मध्ये रिसीव्हरचा स्फोट झाला. अपघातात सुनीलने आपले दोन्ही हात कायमचे गमावले. त्यानंतर त्याचे वडील आणि मोठी बहीण यांचंही निधन झालं. कुटुंब या धक्क्यातून सावरलं नाही. फ्रॅक्ट्री बंद झाली आणि घराची जबाबदारी त्याच्या आईच्या खांद्यावर आली. परिस्थिती कठीण होती आणि त्याला अनेक टोमणे सहन करावे लागले, पण त्याच्या आईने "जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आधी लहान व्हायला शिका" असा सल्ला दिला.
एके दिवशी, पॅरालिम्पिक खेळाडू देवेंद्र झाझरियाच्या संघर्षाची गोष्ट वाचून सुनीलला दिशा मिळाली. त्याने कोटा येथे येऊन पॅरा-एथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. कोच अजित सिंग राठोड यांनी त्याला मोफत ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. सुनीलने आपला अभ्यास सोडला नाही आणि बीएसटीसी पूर्ण केलं. २०१८ मध्ये सुनीलने जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिलं गोल्ड मेडल जिंकलं आणि तिथून यशाची मालिका सुरू झाली. तीन वर्षांत त्याने १८ मेडल जिंकली.
सुनीलने १०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत ऑल इंडिया फर्स्ट रँक मिळवला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत सिल्व्हर मेडल जिंकून देशाला सन्मानित केलं. त्याच्या कामगिरीसाठी त्याला अनेक सन्मान मिळाले, ज्यात मेजर ध्यानचंद समर्पण पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार २०२४ आणि सुवर्ण भारत पुरस्कार यांचा समावेश आहे. सुनीलपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.