अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:00 IST2025-12-05T16:00:04+5:302025-12-05T16:00:57+5:30
ज्या राखी नावाच्या आईच्या सहा वर्षांच्या मुलीला पूनमने निर्दयतेने मारले, तीच राखी आता त्या 'सायको' पूनमच्या दुसऱ्या लहान मुलाची मायेने देखभाल करत आहे.

अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
हरियाणाच्या सोनीपतमध्ये 'सायको किलर' म्हणून ओळखली जाणारी पूनम नावाच्या महिलेने स्वतःच्या एका मुलासह एकूण चार निष्पाप बालकांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने या सर्व मुलांना पाण्यात बुडवून मारले. तिने विधि नावाच्या मुलीची हत्या केल्यानंतर तिच्या क्रूर कृत्यांचा पर्दाफाश झाला. मात्र, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट ही आहे की, ज्या राखी नावाच्या आईच्या सहा वर्षांच्या मुलीला पूनमने निर्दयतेने मारले, तीच राखी आता त्या 'सायको' पूनमच्या दुसऱ्या लहान मुलाची मायेने देखभाल करत आहे.
एकीकडे सायको किलर पूनम आहे, जिने द्वेष आणि मत्सर यातून निष्पाप मुलांचे जीव घेतले, तर दुसरीकडे राखी आहे. राखीच्या सहा वर्षांच्या मुलीला पूनमने क्रूरपणे टबमध्ये बुडवून मारले, तरीही राखी तिच्या मुलीची मारेकरी असणाऱ्या महिलेच्या मुलाला मायेने जवळ घेत आहे आणि त्याला खाऊपिऊ घालून त्याची काळजी घेत आहे. पूनमच्या सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे की, पूनमचा मुलगा त्यांच्या कुटुंबाचा वारस आहे. पूनमच्या गुन्ह्यात त्याचा काहीच दोष नाही. त्याला वाढवण्याची जबाबदारी कुटुंबावर आहे आणि कुटुंब आपला धर्म निभावत आहे.
टबमध्ये बुडवून केली हत्या
पूनमच्या गुन्ह्याचा पर्दाफाश ३० नोव्हेंबर रोजी झाला. ती एका लग्नात सामील होण्यासाठी गेली होती. १ डिसेंबर रोजी दुपारी वरात निघून गेल्यानंतर, तिने विधिला बाथरूममधील पाण्याचा टब स्टोअर रूममध्ये ठेवण्यासाठी मदतीला बोलावले. विधि तिथे गेल्यावर पूनमने तिला टबमध्ये बुडवून तिची हत्या केली.
विधिच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पोलीस पोहोचले, तेव्हा ही हत्या पूनमनेच केल्याचे उघड झाले. पोलिसांनी पूनमची कसून चौकशी केली असता, तिने केवळ विधिचीच नव्हे, तर यापूर्वी शुभम, इशिता, जिया आणि स्वतःच्या मोठ्या मुलासह एकूण तीन अन्य बालकांची हत्या केल्याची कबुली दिली. विधिची हत्या केल्यानंतरही ती आणखी काही मुलांना मारण्याच्या तयारीत होती, पण त्यापूर्वीच तिचे सत्य जगासमोर आले.
यापूर्वी दोनदा हत्येचा प्रयत्न
पोलिसांच्या चौकशीत असेही समोर आले की, पूनमने विधिची हत्या करण्याचा प्रयत्न यापूर्वी दोनदा केला होता. विधिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, विधि जेव्हा दोन वर्षांची होती, तेव्हा पूनमने तिच्या डोळ्यात पेन्सिल मारून रक्त काढले होते. त्यावेळी पूनमने खेळताना अपघात झाला, अशी कहाणी रचली होती. एकदा तिने विधिच्या अंगावर गरम चहाही टाकला होता आणि तेव्हाही ती 'चूकून झाले' असे म्हणाली होती. आता कुटुंबाला संशय आहे की, पूनमने त्या दोन्ही वेळी जाणीवपूर्वक विधिला दुखापत पोहोचवली होती. वात्सल्य आणि क्रूरता या दोन टोकाच्या भावना एकाच कुटुंबात अनुभवण्यास मिळाल्याने हा समाज हादरून गेला आहे.