करुन दाखवलं! 3.5 फूट उंचीमुळे लोकांनी उडवली खिल्ली; IAS होऊन 'तिने' दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 14:39 IST2023-03-25T14:30:51+5:302023-03-25T14:39:24+5:30
उंचीमुळे लोकांनी खूप खिल्ली उडवली. मात्र मेहनतीच्या जोरावर यश संपादन करून अशा लोकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

फोटो - news18 hindi
अनेकदा लोक रंग, रुप आणि उंचीच्या आधारावर इतरांना जज करत असतात. पण क्षमता यावरून ठरत नाही. अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या संघर्षाची कहाणी आपण पाहिली आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. ज्यांची उंची फक्त 3.5 फूट आहे. त्यांच्या उंचीमुळे लोकांनी त्यांची खूप खिल्ली उडवली. मात्र मेहनतीच्या जोरावर यश संपादन करून त्यांनी अशा लोकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
आयएएस आरती डोगरा यांनी अथक परिश्रमाने यश संपादन केलं आहे. आरती यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. आरती डोगरा या मुळच्य़ा डेहराडून, उत्तराखंडच्या आहेत. कर्नल राजेंद्र आणि कुसुम डोगरा यांच्या त्या कन्या आहेत. त्याची आई एका शाळेत मुख्याध्यापिका आहे. आरती यांच्या आई-वडिलांनीही नेहमीच पाठिंबा दिला आहे.
आरती डोगरा यांचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की ती कधीही सामान्य शाळेत शिकू शकणार नाही. पण याला नकार देत त्यांनी आपले शालेय शिक्षण डेहराडूनमधील प्रतिष्ठित गर्ल्स स्कूलमधून केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेजमधून इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे.
आरती डोगरा यांना लहानपणापासूनच शारीरिक भेदभावाला सामोरे जावे लागले. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. आरती यांनी 2005 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण होण्यात यशस्वी झाल्या. त्यांना ऑल इंडिया 56 वा रँक मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"