Delhi Election: केजरीवालांच्या प्रतिमासंवर्धनाची यशस्वी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:15 IST2020-02-12T05:39:16+5:302020-02-12T08:15:10+5:30
आंदोलन करण्याचा जणू काही स्वभावच अरविंद केजरीवाल यांचा होता. परंतु राजकीय पक्ष स्थापन करणे, सत्ता मिळाल्यानंतर येते ते सत्तासंचालन.

Delhi Election: केजरीवालांच्या प्रतिमासंवर्धनाची यशस्वी कहाणी
प्र्रजासत्ताक दिन सोहळा आठवडाभरावर असताना रेल्वे भवनाशेजारी केंद्राविरोधात २०१४ साली आंदोलन करणारे अरविंद केजरीवाल ते गेल्या अडीच वर्षांपासून एकही वादग्रस्त विधान न करणारे अरविंद केजरीवाल. केजरीवाल यांच्या परिपक्वतेचा हा राजकीय प्रवास आहे. केवळ केंद्राला कोसायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची, कुणाविरोधातही वादग्रस्त विधान करायचे व नंतर माफी मागायची- अशा आक्रस्ताळ्या भूमिकेतून केजरीवाल बाहेर पडले. त्यातून झालेले प्रतिमासंवर्धनच केजरीवालांच्या यशाचे मुख्य गमक आहे.
आंदोलन करण्याचा जणू काही स्वभावच अरविंद केजरीवाल यांचा होता. परंतु राजकीय पक्ष स्थापन करणे, सत्ता मिळाल्यानंतर येते ते सत्तासंचालन. केजरीवाल यांनी सत्तेचा गाडा हाकताना शेवटच्या अडीच वर्षांत नेमके त्याचे भान मिळवले. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांऐवजी केजरीवाल सोशल मीडियावरूनच लोकांशी बोलत. साधेपणा, भ्रष्टाचारमुक्त कारभार या गुळगुळीत मुद्द्यांऐवजी केजरीवाल यांनी वीज, पाणी, शिक्षण ही त्रिसूत्री नेमकी हेरली.
परदेशात शिकलेल्या आतिशी यांना शिक्षणाचे मॉडेल विकसित करण्याची संधी दिली. महिला सुरक्षेवरून सातत्याने केंद्र सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या स्वाती मालिवाल यांना नेहमीच पुढे केले. गोपाल राय यांना ‘केडर’चा मुख्य चेहरा बनवण्यासाठी सत्तर
मतदारसंघात निवडणुकीच्या चार महिने आधीच यात्रा काढायला सांगितली. स्वपक्षातील टीकाकार, बंडखोरांचा बंदोबस्त करताना प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांना केजरीवालांनी बळ दिले. विरोधी सूर आवळणारे आमदार निलंबित करण्यासाठी सभागृह व्यवस्थापन (फ्लोअर मॅनेजमेंट) केले. पक्ष व सरकार अशी स्वतंत्र विभागणी केजरीवाल यांनी केली. सरकारचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय गेल्या अडीच वर्षांत केजरीवाल यांनी अपवादाने स्वत:च जाहीर केले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यावर निर्णय जाहीर करण्याची जबाबदारी सोपवली.
महिलांना मोफत प्रवास, दिल्लीतील शाळा, मोहल्ला क्लिनिक, आरोग्य योजना, मोफत तीर्थयात्रा, एससी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजनांमध्ये केजरीवाल यांचेच प्रतिमासंवर्धन झाले. कितीही टीका झाली तरी थेट उत्तर दिले नाही. मेट्रोत महिलांना मोफत प्रवास योजनेवरून मेट्रो मॅन श्रीधरन यांनी टीका केली, विरोध दर्शवला तरी केजरीवाल यांनी त्यांच्याविरोधात चकार शब्दही काढला नाही. मनीष सिसोदिया यांनी श्रीधरन यांना पत्र लिहून उत्तर दिले.
भाजपविरोधी असले तरी काँग्रेसधार्जिणे न होण्याचा स्वतंत्र बाणा अरविंद केजरीवाल यांनी व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी जपला. तृणमूल काँग्रेससारख्या कर्कश्श पक्षापासून ते चार हात लांब राहिले. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास विनाविलंब समर्थन दिले, पण ‘आम्ही शाहीनबाग सोबत आहोत’ असे म्हणून दिल्लीत ‘प्लेसमेंट’ पक्की केली. आधी दिल्ली नंतर देश हे
पक्षविस्ताराचे समीकरण केजरीवाल विसरले नाहीत.
राज्यसभेच्या तीन जागांसाठी एका उद्योजकाची वर्णी लावताना राजकीय पक्ष चालवणे म्हणजे ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी चालवण्यासारखे असते याचेही भान केजरीवालांनी राखले. आज भाजप असो वा काँग्रेस. सर्वदूर केजरीवालांचे चाहते आहेत. कारण केजरीवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भिडतात. वीज, पाणी, आरोग्य, रस्ता यावर बोलतात. स्वत: वृत्तीने धार्मिक असले तरी त्याचे प्रकटीकरण करताना सार्वजनिक जीवनात भान राखतात. २०१२ ते २०२० या सार्वजनिक जीवनातील काळात केजरीवाल पहिल्यांदा जाहीरपणे मंदिरात गेले तेही ‘पॉलिटिकल कंपल्शन’ म्हणून. न पटणाºया मुद्द्यांवर केजरीवाल भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांच्या बैठकीतून सरळ उठून जात. अण्णा हजारे याचे साक्षीदार आहेत. अगदी अलीकडे केजरीवालांनी नायब राज्यपालांच्या घरी ठिय्याही दिला होता. आक्रस्ताळ्या भूमिकेतून केजरीवाल यांनी स्वत:ला योजनापूर्वक बाहेर काढले. पक्ष व
सरकारमध्ये स्वत:ला प्रस्थापित केले. एका अर्थाने ही निवडणूक केजरीवालांच्या याच प्रवासाचे द्योतक आहे!
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंह यांच्याऐवजी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकारीच सर्वाधिक चर्चेत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ‘कल्चर’ बदलले. अरविंद केजरीवाल यांनीदेखील सत्तासंचालनात मोदींचाच वारसा स्वीकारला. यशस्वी सत्तासंचालन हेच केजरीवालांचे खरे यश आहे. अपयशाचा धनी आम आदमी पक्ष व विजयपर्वाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल - हीच त्यांच्या समर्थक व विरोधकांचीही धारणा आहे.
- टेकचंद सोनवणे । खास प्रतिनिधी, लोकमत, दिल्ली