Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेला जोरदार प्रतिसाद, ज्येष्ठ नेत्यांकडून मनधरणी, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत राहुल गांधींचा मोठा निर्णय, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:17 IST2022-09-22T15:14:50+5:302022-09-22T15:17:43+5:30
Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेला मिळत असलेला जोरदार प्रतिसाद आणि ज्येष्ठ नेत्यांकडून होत असलेल्या मनधरणीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेला जोरदार प्रतिसाद, ज्येष्ठ नेत्यांकडून मनधरणी, काँग्रेस अध्यक्षपदाबाबत राहुल गांधींचा मोठा निर्णय, म्हणाले...
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो या दीर्घ यात्रेवर निघाले आहेत. या यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेला मिळत असलेला जोरदार प्रतिसाद आणि ज्येष्ठ नेत्यांकडून होत असलेल्या मनधरणीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
केरळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, ‘मी माझ्या जुन्या भूमिकेवर कायम आहे. मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही’. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुठल्यातरी बिगरगांधी व्यक्ती बसावी, असं मत मांडलं होतं. मात्र काँग्रेसचं अध्यक्षपद हे पुन्हा एकदा राहुल गांधींनीच स्वीकारावं, अशी मागणी पक्षातून अधूनमधून होत असते.
गेल्या तीन वर्षांमध्ये काँग्रेसच्या तमाव वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांची मनधरणी करण्याच प्रयत्न केला. हल्लीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानंतर राहुल गांधींची मनधरणी करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. हल्लीच काँग्रेसच्या १० राज्यातील कार्यकारिणींनी राहुल गांधींना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. मात्र असं असलं तरी राहुल गांधी सातत्याने काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार देत आहेत.