दहशतवादावर कठोर कारवाई, जम्मू-काश्मीरबाबत अमित शाहांच्या सुरक्षा दलांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:48 IST2025-02-05T18:47:50+5:302025-02-05T18:48:41+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बुधवारी दिल्लीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

दहशतवादावर कठोर कारवाई, जम्मू-काश्मीरबाबत अमित शाहांच्या सुरक्षा दलांना सूचना
Amit Shah Meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) दिल्लीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. घुसखोरी पूर्णपणे संपुष्टात यावी यासाठी गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले. जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर दोन दिवसांत दोन उच्चस्तरीय आढावा बैठकांचे अध्यक्षता करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.
दहशतवाद्यांना उखडून टाका
या बैठकीत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसह गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाची परिसंस्था कमकुवत झाली आहे. दहशतवाद्यांचे अस्तित्व उखडून टाकणे हे आमचे उद्दिष्ट आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारातून होणाऱ्या दहशतवादाला तातडीने आणि कठोरपणे आळा घालण्यात यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
लष्करप्रमुखांसोबत आढावा बैठक
गृहमंत्र्यांनी मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. गृहमंत्र्यांनी नवीन फौजदारी कायद्याच्या दृष्टीने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.