क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई, विधानसभा अध्यक्षांनी ठरवले अपात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 13:13 IST2024-02-29T12:15:16+5:302024-02-29T13:13:55+5:30
Himachal Pradesh Congress MLA: राज्यसभा निवडणुकीदरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केल्याने पक्षाचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभव पत्करावा लागला होता. तसेच राज्यातील काँग्रेसचं सरकारही अडचणीत आल होतं.

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई, विधानसभा अध्यक्षांनी ठरवले अपात्र
राज्यसभा निवडणुकीदरम्यान हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसच्याआमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केल्याने पक्षाचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभव पत्करावा लागला होता. तसेच राज्यातील काँग्रेसचं सरकारही अडचणीत आल होतं. दरम्यान, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या या सर्व सहा बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत काँग्रेसने दिले होते. त्यानुसार हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी या सहा बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी सांगितले की, या आमदारांनी निवडणूक काँग्रेसकडून लढवली, मात्र पक्षाच्या व्हिपचं पालन केलं नाही, व्हिपचं उल्लंघन करून त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केलं नाही. त्यानंतर मी सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतली. ज्या आमदारांना अपात्र ठरवण्याल आलं त्यामध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे.
मात्र या कारवाईनंतरही हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारवर आलेले संकट टळलेले नाही. आज मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या नाश्त्याच्या कार्यक्रमाला चार आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे मुख्यमंत्की सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासमोरील आव्हान कायम आहे. विक्रमादित्य सिंह, मोहन लाल, नंद लाल आमि धनिराम हे आमदार मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या कार्यक्रमाला दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे.
हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडाळी झाली होती. तसेच काँग्रेसच्या सहा आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या ३ अशा नऊ आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी आणि भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन यांची प्रत्येकी ३४-३४ मतं झाली होती. त्यानंतर टाय झाल्याने काढलेल्या चिठ्ठीमध्ये सिंघवी यांचं नाव आल्याने त्यांना पराभूत घोषित करण्यात आले. तर भाजपाचे हर्ष महाजन यांचा विजय झाला.