चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:16 IST2025-12-03T18:15:22+5:302025-12-03T18:16:03+5:30
एका महिलेने तिच्या नवजात बाळाला कडाक्याच्या थंडीत बाथरूमबाहेर सोडून दिलं. यानंतर कुत्र्यांनी मुलाचा जीव वाचवला.

चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान बंगालमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नादिया जिल्ह्यातील नवद्वीप येथील रेल्वे कामगार कॉलनीमध्ये ही घटना घडली, जिथे एका महिलेने तिच्या नवजात बाळाला कडाक्याच्या थंडीत बाथरूमबाहेर सोडून दिलं. यानंतर कुत्र्यांनी मुलाचा जीव वाचवला. बाळाचा जन्म काही तासांपूर्वीच झाला होता.
एका निर्जन ठिकाणी थंडीमध्ये बाळ रस्त्यावर रडत होतं. कडाक्याच्या थंडीत हे नवजात बाळ इतका वेळ कसं जगलं हे चमत्कारापेक्षा कमी नाही. भटक्या कुत्र्यांनी बाळावर हल्ला करून त्याला मारलं असतं. परंतु, त्यांनी एक मुलाच्या सुरक्षेसाठी त्याला घेरलं, रात्रभर त्याचं रक्षण केलं. सकाळी सूर्योदय झाल्यावरच कुत्रे निघून गेले.
घटनास्थळी पोहोचलेल्या सुकला मंडल या महिलेने सांगितलं की, आम्ही जेव्हा बाळाला पाहिलं तेव्हा आमच्या अंगावर काटा आला. नवजात बाळाभोवती असलेले कुत्रे आक्रमक नव्हते. ते भुंकत राहिले, जणू काही बाळाच्या जीवाला धोका असल्याचे संकेत देत होते. महिला हळूहळू बाळाच्या जवळ आली. ती जवळ आल्यावर कुत्रे मागे हटले.
सुभाष पाल या व्यक्तीने दिलेल्या माहितीननुसार, आम्हाला रात्री बाळाचं रडणं ऐकू आलं, पण आम्हाला वाटलं की कोणीतरी आजारी असेल म्हणून रडत आहे. पण सकाळी जेव्हा आम्ही बाळाला कुत्र्यांसह तिथे पडलेले पाहिले तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला. सुकला यांनी बाळाला तिच्या स्कार्फमध्ये गुंडाळलं आणि ताबडतोब तिच्या शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांनी त्याला महेशगंज रुग्णालयात नेलं, जिथे बाळाची प्रकृती पाहून त्याला कृष्णनगर सदर रुग्णालयात हलवण्यात आलं.
डॉक्टरांनी सांगितलं की, बाळाला कोणतीही जखम नव्हती. तसेच जन्मानंतर काही मिनिटांनी त्याला रस्त्यावर सोडून देण्यात आलं होतं. नवद्वीप पोलीस तपास करत आहेत. तीव्र थंडीत मुलाचा जीव वाचणं आणि कुत्र्यांनी त्यांचं रक्षण करणं हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. सध्या सर्वत्र या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.