सोशल मीडियाच्या वेगाने होत असलेल्या प्रसारामुळे फेसबूक, इन्स्टाग्राम अशा माध्यमांवर ओळखीतल्याआणि अनोखळी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, फॉलो करणं ही सामान्य बाब बनली आहे. या माध्यमांवर एखाद्या मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मुलगे सहसा ती नाकारत नाहीत. मात्र हरियाणामधील फरिदाबाद येथे एक अजब घटना घडली आहे. येथे एका तरुणीने इन्स्टाग्रामवर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट बीटेकचा विद्यार्थी असलेल्या तरुणाने नाकारली. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने सुरुवातीला या तरुणाचं अपहरण केलं, त्यानंतर त्याला बेदम मारहाणही केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना डबुया कॉलनी येथील आहे. याबाबत मारहाण झालेल्या मुलाचे वडील मनोज कुमार यांनी तक्रार दिली आहे. त्यात ते म्हणाले की, माझा मुलगा ध्रुव कुमार हा बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. जुलै महिन्यात इन्स्टाग्रामवर त्याला एका मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मात्र ध्रुव याने ही रिक्वेस्ट स्वीकारली नाही. त्यानंतर या तरुणीने त्याला शिविगाळ केली.
त्यानंतर या तरुणीसोबत असलेल्या हर्ष भडाना, लक्की आणि आणखी एकाने मिळून १२ सप्टेंबर रोजी कॉलेजमधून परतत असणाऱ्या माझ्या मुलग्याचं नीलम चौक येथून अपहरण केलं. हर्ष आणि लक्की यांनी ध्रूव याला दुचाकीवर बसवून नेले. तर सदर तरुणी दुसऱ्या दुचाकीवरून मागून आली. त्यांनी ध्रूव याला मारहाण करून प्याली चौकास सोडताना धमकी दिली.
जेव्हा आम्ही पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरुवातीला आमची तक्रारही नोंदवून घेतली नाही. काही दिवस सहन केल्यानंतर जेव्हा आम्ही डीसीपी एनआयटी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिकारी श्रीभगवान यांनी सांगितले की, ध्रुव याने आधी वैयक्तिक पातळीवर हे प्रकरण मिटवण्याचे मान्य केले होते. मात्र आता पीडिताच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.