'लव्ह जिहाद थांबवा, अन्यथा बजरंग दलामधील मुलं मुस्लीम मुलींना पटवतील', व्हीएचपी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 20:19 IST2017-11-28T17:42:33+5:302017-11-28T20:19:58+5:30
'लव्ह जिहाद थांबवा, अन्यथा बजरंग दलामधील मुलं मुस्लीम मुलींना पटवतील' असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्याने केलं आहे.

'लव्ह जिहाद थांबवा, अन्यथा बजरंग दलामधील मुलं मुस्लीम मुलींना पटवतील', व्हीएचपी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
उडुपी - विश्व हिंदू परिषदेतर्फे उडुपी येथे तीन दिवसांच्या धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'लव्ह जिहाद थांबवा, अन्यथा बजरंग दलामधील मुलं मुस्लीम मुलींना पटवतील' असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्याने केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी स्वामी नरेंद्रनाथ यांनी हिंदूंनी हातात मोबाइल नव्हे तर शस्त्रे उचलावीत असे वक्तव्य केलं होतं.
व्हीएचपीचे नेता गोपाल यांनी धर्म संसदेमध्ये बोलताना लव्ह जिहादवर आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, जर मुस्लिमांनी लव्ह जिहाद थांबवला नाही तर बजरंग दलातील तरुण मुलं, मुस्लीम मुलींना पटवतील. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवतही उपस्थित होते. गोपाल पुढे म्हणाले की, मुस्लिमांनी लव्ह जिहाद थांबवायला पाहिजे, आम्ही प्रेमाच्या विरोधात नाही. आमच्या मुली, शाहरुख, सलमान, गिरीश आणि सुनिल यांना एकसारखंच मानतात. हिंदू मुलींना समजत नाही की, हिंदू मुलं फक्त एकवेळाच लग्न करतात, पण मुस्लीम समाजात एकापेक्षा जास्त लग्न केली जातात. पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदूनं लव्ह जिहादबद्दल गांभीर्यानं विचार करायला हवा.
हिंदूंनी हातात मोबाइल नव्हे तर शस्त्रे उचलावीत - स्वामी नरेंद्रनाथ
भारतातील हिंदू मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. दहशतवाद्यांकडून हिंदू समाजाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीने हातात मोबाइल नव्हे तर शस्त्रे उचलायला हवीत, असे विधान हिंदू धर्मगुरू स्वामी नरेंद्रनाथ यांनी कर्नाटकातील उडुपी येथे केले. लाखोंच्या किंमतीचे मोबाइल जवळ बाळगण्याची गरजच काय आहे? सुरक्षा आणि आत्मसंरक्षणासाठी प्रत्येक हिंदू व्यक्तीने मोबाइलऐवजी शस्त्रे उचलायला हवीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संभाव्य संकटांपासून वाचण्यासाठी आणि त्याबाबत हिंदूंमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हे आवाहन केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, धर्म संसदेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उपस्थितांना संबोधित केले होते. 'अयोध्येत राम मंदिरच उभे राहील आणि तिथे असलेल्या शिळांचा वापर करूनच होईल. लवकरच राम मंदिरावर एक भगवा ध्वज फडकताना दिसेल. तो दिवस फार दूर नाही,' असे भागवत म्हणाले होते.