SSC, HSC Exam : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करा - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 06:50 IST2021-04-14T00:36:07+5:302021-04-14T06:50:32+5:30
SSC, HSC Exam : केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीत गत २४ तासांत १३,५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. परीक्षा आयोजित केल्या तर संसर्ग वाढू शकतो.

SSC, HSC Exam : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करा - अरविंद केजरीवाल
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा टळल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात याव्यात. ऑनलाइन परीक्षांसह पर्यायी मार्ग शोधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीत गत २४ तासांत १३,५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. परीक्षा आयोजित केल्या तर संसर्ग वाढू शकतो. तथापि, राज्यांकडून होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबत विचारविमर्श सुरू केला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले की, सीबीएसई परीक्षा रद्द करण्याची मागणी मी केंद्राकडे करत आहे. ऑनलाइन परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्याबाबत विचार होऊ शकतो.
४ मेपासून आहे परीक्षा
केजरीवाल म्हणाले की, अनेक देशांनी असे केले आहे. भारतातही काही राज्ये असे निर्णय घेत आहेत. पर्यायी मार्गावर विचार करण्यात येत आहे. सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा ४ मेपासून सुरू होणार आहे.