राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:47 IST2025-10-29T15:46:40+5:302025-10-29T15:47:38+5:30
भारतीय वायुसेनेच्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांच्याबद्दल पाकिस्तानच्या प्रचार यंत्रणेने अनेक भंपक दावे केले, पण दरवेळी त्यांच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरुद्ध आणि विशेषतः भारतीय सैन्याबद्दल खोटे दावे करत बदनाम करण्याचा पाकिस्तानचा जुना प्रयत्न 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुन्हा एकदा उघड झाला आहे. भारतीय वायुसेनेच्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांच्याबद्दल पाकिस्तानच्या प्रचार यंत्रणेने अनेक भंपक दावे केले, पण दरवेळी त्यांच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला आहे. पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांचे लढाऊ विमान पाडले गेले आणि शिवांगी सिंग यांना युद्धबंदी बनवण्यात आले आहे. मात्र, बुधवारी सकाळी स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांनी हरियाणातील अंबाला वायुसेना तळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत आत्मविश्वासाने हसत फोटो काढले. हे दृश्य पाहिल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला असेल, यात शंकाच नाही.
ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानचा प्रचार
यावर्षी मे महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण मारले गेले होते. यानंतर भारताने लष्करी प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी प्रचार यंत्रणा पूर्ण वेगाने कामाला लागली आणि अनेक लष्करी यशाचे दावे करू लागली. यातील कोणताही दावा खरा नव्हता.
पाकला पुरावे सादर करून चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानने सहा भारतीय लष्करी विमाने पाडल्याचा खोटा दावा केला, ज्यात नुकतेच खरेदी केलेले महागडे फ्रेंच राफेल लढाऊ जेटही सामील होते. यावर भारतीय सैन्य आणि सरकारने तात्काळ सविस्तर स्पष्टीकरण दिले. त्यांनी मोठ्या प्रमाणात आकडेवारी आणि दृश्य पुरावे सादर केले आणि पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला.
भारतीय वायूसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह स्पष्ट केले की, पाकिस्तानने एकही भारतीय विमान पाडले नाही, उलट त्यांनी स्वतःची सहा विमाने गमावली. यामध्ये अमेरिकेची चार एफ-१६ लढाऊ विमाने, चीनचे जेएफ-१७ लढाऊ विमान आणि एक एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमान यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला पायलट शिवांगी सिंग यांना पकडल्याचा दावा
याच खोट्या दाव्यांच्या मालिकेत एक आणखी अफवा पसरवण्यात आली. स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांचे विमान नष्ट झाले आणि त्यांना अटक करण्यात आली, असा दावा अनेक पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्सवर पसरवला गेला. इतकेच नाही तर, एअर चीफ मार्शल शोकाकूल कुटुंबाला भेटायला गेल्याचे बनावट व्हिडीओ देखील व्हायरल झाले.
भारताने तात्काळ याला कडक प्रत्युत्तर दिले. केंद्र सरकारच्या 'फॅक्ट-चेक' युनिटने स्पष्ट केले की, "भारतीय महिला पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले आहे, हा पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया हँडल्सने केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे!"
President Droupadi Murmu took a sortie in a Rafale aircraft at Air Force Station, Ambala, Haryana.
— ANI (@ANI) October 29, 2025
She is the first President of India to take a sortie in two fighter aircraft of the Indian Air Force. Earlier, she took a sortie in Sukhoi 30 MKI in 2023.
(Source: Rashtrapati… pic.twitter.com/9xbLrp8eKK
अन् पाकिस्तानची बोलती झाली बंद!
बुधवारी अंबाला वायुसेना तळावर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत आत्मविश्वासपूर्ण आणि हसऱ्या चेहऱ्याने फोटोसाठी उभ्या असलेल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांनीच पाकिस्तानच्या सर्व खोट्या प्रचाराला सर्वात मोठी चपराक दिली आहे. भारतीय सैन्याचे मनोबल आणि सत्य किती मजबूत आहे, हे या फोटोतून जगाला पुन्हा एकदा दिसले आहे.