भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:05 IST2025-10-29T14:05:02+5:302025-10-29T14:05:31+5:30
Bhabha Atomic Research Centre News: भारताच्या अणुसंशोधनामधील महत्त्वाचं नाव असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राची हेरगिरी करण्याचा मोठा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आदिल हुसेन आणि त्याचा भाऊ अख्तर हुसेनी या दोन आरोपींच्या केलेल्या चौकशीमधून हेरगिरी करण्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग
भारताच्या अणुसंशोधनामधील महत्त्वाचं नाव असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राची हेरगिरी करण्याचा मोठा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आदिल हुसेन आणि त्याचा भाऊ अख्तर हुसेनी या दोन आरोपींच्या केलेल्या चौकशीमधून हेरगिरी करण्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आदिल हुसेन आणि अख्तर हुसेनी हे आरोपी आपण मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करत होते. या दोघांनीही बनावट ओळखीच्या माध्यमातून संवेदनशील माहिती परदेशी संस्थांना पाठवल्याचा आणि त्यांचा संबंध आयएसआयचे हँडलर्स आणि इराणमधील अणुसंस्थेशी असल्याचा आरोप आहे.
आदिल आणि अख्तर या भावांनी भाभा अणुसंशोधन केंद्राची चीन बनावट ओखळपत्रं बनवल होती. या ओळखपत्रांच्या मदतीने ते अणुकेंद्रात प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी स्वत: शास्त्रज्ञ असल्याचे बासवण्यासाठी भाभा आणुसंशोधन केंद्राचा लोगो आणि इतर अधिकृत कागदपत्रांच्या बनावट प्रति तयार करायचे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
आरोपींकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशीमधून ही टोळी आयएसआयचे हँडलर्स, इराणमधील अणूसंस्था आणि रशियाच्या गुप्तहेर यंत्रणेच्या संपर्कात होती, अशी माहिती समोर आली आहे. स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार आदिल सय्यद हा आदिल हुसेन, मोहम्मद आदिल हुसेनी आणि नसीमुद्दीन यांसारख्या अनेक नावांनी काम करत होता. त्याच्याजवळ अनेक बनावट पासपोर्ट, बनावट ओखळपत्र आणि संवेदनशील कागदपत्रं सापडली आहेत.
दोन्ही आरोपींनी या बनावट पासपोर्टच्या मदतीने दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये अनेकदा प्रवास केलेला आहे. तिथे परदेशी एजंटांना सुरक्षा आणि अणुसंदर्भातील माहिती विकण्याची ऑफर त्यांनी दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदिल हुसेनी बरीच वर्षे दुबईमध्ये राहिला आणि त्याने हेरगिरीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांमधून तिथे अनेक मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली.
दरम्यान, स्पेशल सेलने या नेटवर्कशी संबंधित एका कॅफे संचालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीतील इकर सदस्य सध्या फरार आहेत. पोलीसही सातत्याने छापेमारी करत आहेत. तसेच परदेशी यंत्रणांच्या संपर्काचा तपास करत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आदिल याने भावासोबत मिळून बनावट ओळख बनवून संवेदनशील माहिती परदेशात पाठवल्याचं मान्य केलं आहे. आरोपींकडून अनेक गोपनीय कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसही पोलिसांच्या हाती लागले आहेत, त्यांचा तपास फॉरेन्सिक पथकाकडून सुरू आहे.