New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्लीरेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. भाविकांना प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाता यावे यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात आली आहे. यामुळे स्थानकावर मोठी गर्दी झाली. दरम्यान अचानकच अजमेरी गेट साइड कडून प्लेटफॉर्म नंबर १४ आणि १६ वर चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती ९:५५ वाजण्याच्या सुमारास मिळाल्यानंतर, रेल्वे प्रशासन आणि सुरक्षण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी करून दिलेल्या माहितीनुसार, "प्रयागराज एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक १४ वर उभी असताना, प्लेटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. स्वतंत्रा सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी लेट होती. या रेल्वेचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक १२,१३ आणि १४ वर होते. रेल्वेने दर तासाला CMI च्या हिशेबाने १५०० जनरल टिकटांची विक्री केली. यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.
15 जणांचा मृत्यू -या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. यात २ मुलांचाही समेश आहे. याशिवाय १० लोक गंभीर जखमी असल्याचेही समजते. अचानक रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले होते. यामुळे हा गोंधळ उडाला. एलएनजेपी रुग्णालयाने मृत्यूंची पुष्टी केली आहे.
चौकशीसाठी रेल्वेकडून द्विसदस्यीय समितीची स्थापना -यासंदर्भात बोलताना रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, "आज सायंकाळच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा खूप अधिक होती. यामुळे रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या चालवल्या. काही वेळासाठी प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, यामुळे काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या परिस्थिती सामान्य आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफ डीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.