अलीगढमध्ये सपाच्या नेत्याची गोळी मारून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 13:38 IST2019-05-01T13:35:42+5:302019-05-01T13:38:30+5:30
रात्री उशिरा राकेश यादव त्यांच्या घरी जाणाऱ्या गल्लीमध्ये वळले होते. याठिकाणीच त्यांची हत्या करण्यात आली.

अलीगढमध्ये सपाच्या नेत्याची गोळी मारून हत्या
अलीगढ : उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना सपाच्या नेत्याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. हरदुआगंजमध्ये ही घटना घडली आहे. राकेश यादव हे बरौली विधानसभा मतदारसंघाचे सपाचे अध्यक्ष आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली.
रात्री उशिरा राकेश यादव त्यांच्या घरी जाणाऱ्या गल्लीमध्ये वळले होते. याठिकाणीच त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी मोठा बंदोबस्त या भागात तैनात केला असून त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावरच ठेवून गोंधळ घातला. त्यांच्या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
हरदुआगंज क्षेत्रातील मोहल्ला अहीर पाडा येथे राकेश यादव राहतात. ते मालमत्ता दलालीचेही काम करतात. हत्या रात्री 10.15 वाजता झाल्याचे सांगण्यात आले. ते मोटारसायकलवरून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये वळले होते, तेवढ्यात कोणीतरी गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून गल्लीतील लोक धावून आले. तेव्हा राकेश रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. तेवढ्यात घरातील कुटुंबीयही तेथे पोहोचले. घटनास्थळी कोणीही हल्लेखोर दिसला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
राकेश यादव यांच्या हत्य़ेमागे मालमत्ता वाद असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच निवडणुकीचा काळ सुरु असल्याने त्यादृष्टीनेही तपास सुरु आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून सकाळपर्यंत पोलिसांना मृतदेह ताब्यात घेता आला नव्हता.