"सोनियांनी २००४ मध्ये पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं; काँग्रेसची दुर्दशा झाली नसती"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 23:06 IST2021-09-25T23:03:45+5:302021-09-25T23:06:23+5:30
कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होतात, तर सोनियाही भारताच्या पीएम होऊ शकत होत्या; आठवलेचं विधान

"सोनियांनी २००४ मध्ये पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं; काँग्रेसची दुर्दशा झाली नसती"
इंदूर: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ शकतात, मग इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधीदेखील १७ वर्षांपूर्वी देशाच्या पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) बहुमत मिळालं होतं. तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं, असं आठवले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा असताना आठवलेंनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. '२००४ च्या निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळालं. सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं असा प्रस्ताव त्यावेळी मीच पुढे ठेवला होता. त्यांच्या परदेशी वंशाचा त्यावेळी कोणताही विषय नव्हता, असं माझं मत होतं. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षा होऊ शकतात. तर भारताच्या नागरिक, राजीव गांधींच्या पत्नी आणि लोकसभेवर निवडून आलेल्या सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?', असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी कोवॅक्सिन घेऊन अमेरिकेला जाऊ शकतात तर मी रोमला का नाही? ममतांचा सवाल
'पवार पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसची दुर्देशा झाली नसती'
'सोनिया गांधींनी २००४ मध्ये पंतप्रधान व्हायला हवं होतं. त्यांना पंतप्रधान व्हायचं नव्हतं, तर त्यांनी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे पंतप्रधानपदाची सूत्रं द्यायला हवी होती. पवार लोकनेते असल्यानं ते पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य होते. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या जागी पवारांना संधी द्यायला हवी होती. पवार २००४ मध्ये पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती,' असं आठवले म्हणाले.