सोनिया गांधी यांची अचानक प्रकृती खालावली, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:11 IST2026-01-06T13:09:16+5:302026-01-06T13:11:43+5:30
Sonia Gandhi Health Update: डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

सोनिया गांधी यांची अचानक प्रकृती खालावली, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात केले दाखल
Sonia Gandhi Hospitalized: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. काँग्रेस पक्षाने अद्याप सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. म्हणूनच त्या नियमित तपासणी आणि उपचारांसाठी वेळोवेळी रुग्णालयात दाखल होत असतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांना कोणत्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
सोनिया गांधी यांना जून २०२५ मध्येही प्रकृती अस्वस्थ झाल्याने याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार, त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणण्यात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत आहेत. त्याआधीच्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये (IGMC) नेण्यात आले होते. याशिवाय, फेब्रुवारी २०२५ मध्येही त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या चार-पाच वर्षांत सोनिया गांधी यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वसनाचा त्रास देखील आहे. २०२२ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळीही त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, सोनिया गांधी, राहुल गांधी व काही बड्या काँग्रेस नेत्यांना गोत्यात आणणाऱ्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीलाच येथील राउस अव्हेन्यू न्यायालयाने धक्का दिला होता. ईडीने मनी लॉड्रिगबाबत दाखल केलेले आरोपपत्र हे खासगी व्यक्तीच्या तक्रारीवर केलेल्या तपासावर होते. मात्र या प्रकरणाची फिर्याद दाखल केली नव्हती. त्यामुळे ईडीचे आरोपपत्र ग्राह्व धरता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.