लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:04 IST2025-09-25T19:00:10+5:302025-09-25T20:04:48+5:30
केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या एनजीओचा परदेशी निधी परवाना रद्द केला आहे.

लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
Sonam Wangchuk NGO: लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक सोनम वांगचुक यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका एनजीओजची एफसीआरए नोंदणी सरकारने रद्द केली आहे. स्वयंसेवी संस्थांना परकीय निधी देण्याच्या कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल सरकारने त्यांची एफसीआरए नोंदणी रद्द केली. केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी हिंसक आंदोलने झाल्यानंतर २४ तासांतच ही नोंदणी रद्द करण्यात आली. गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांना हिंसाचारासाठी जबाबदार धरलं आहे.
लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी बुधवारी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली. या आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांची पोलीस आणि सुरक्षा दलांशी जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर आता सोनम वांगचुक यांना मोठा धक्का देत गृह मंत्रालयाने गुरुवारी त्यांच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख या स्वयंसेवी संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला. एफसीआरए २०१० अंतर्गत अनेक उल्लंघने करण्यात आली आल्याचे केंद्राने म्हटलं. सीबीआयने वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील संस्थेविरुद्ध उल्लंघनांची चौकशी सुरू केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
लडाखस्थित या शैक्षणिक संस्थेला २० ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागवण्यात आले होते. स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखने १९ सप्टेंबर रोजी आपला प्रतिसाद सादर केला, जो मंत्रालयाला असमाधानकारक वाटला आणि एनजीओची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेने निधीचा चुकीचा वापर केल्याचे, परदेशी निधीचा गैरवापर केल्याचे आणि राष्ट्रीय हिताच्याविरुद्ध असलेल्या कार्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.