सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 00:17 IST2025-09-27T00:15:15+5:302025-09-27T00:17:36+5:30
लेहमधल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना अटक करुन जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले.

सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
Sonam Wangchuk: लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आणि कडक सुरक्षेत त्यांना लडाखहून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. सोनम वांगचुक यांना २४ तास सीसीटीव्ही देखरेखीखाली उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर वांगचुक यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वांगचुक यांनी हिंसाचार भडकवल्याचा आरोप गृहमंत्रालयाने केला आहे.
लेह हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर, शुक्रवारी पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांना अटक केली. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आणि जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. परिस्थितीमुळे लेहमधील इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला तर ७० हून अधिकजण जखमी झाले. दुसरीकडे हिंसाचार करणाऱ्या ५० जणांना अटक करण्यात आली आहे.
लेह विमानतळावर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, सोनम वांगचुक यांना एका विशेष विमानाने राजस्थानातील जोधपूर येथे नेण्यात आले. जोधपूर येथे येताच त्यांना कडक सुरक्षेत आणि अनेक सुरक्षा वाहनांच्या ताफ्यात उच्च-सुरक्षा तुरुंग वॉर्डमध्ये हलवण्यात आले, जिथे त्यांना २४ तास सुरक्षा आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवण्यात येईल. लेह पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्याविरुद्ध निदर्शकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याबद्दल अनेक एफआयआर नोंदवला होता.
१० सप्टेंबर रोजी, सोनम वांगचुक यांनी लेह शहरात उपोषण सुरू केले, ज्यासाठी त्यांनी या प्रदेशाचा सहाव्या अनुसूचीत समावेश, राज्याचा दर्जा आणि लडाख प्रदेशाच्या संवेदनशील परिसंस्थेचे संरक्षण या मागण्या केल्या. शहरात व्यापक हिंसाचार उफाळल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्यांनी उपोषण सोडले. बुधवारी लेह शहरात जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक केली. सीआरपीएफच्या एका वाहनाला आग लावण्यात आली. तसेच भाजप कार्यालय आणि लेहच्या सर्वोच्च राजकीय संघटनेचे कार्यालयही जाळण्यात आले आणि लडाखच्या डीजीपींच्या वाहनाचेही नुकसान केले. परिस्थिती चिघळत असताना, सुरक्षा दलांनी गोळीबार केला, ज्यामध्ये चार निदर्शक ठार झाले आणि अंदाजे ७० जण जखमी झाले.