Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:22 IST2025-06-13T20:22:00+5:302025-06-13T20:22:31+5:30
मेघालय पोलिसांना अखेर राजाच्या हत्येनंतर सोनम रघुवंशी ज्या सीक्रेट फ्लॅटमध्ये राहत होती, त्याचा ठावठिकाणा कळला आहे.

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
मेघालय पोलिसांना अखेर राजाच्या हत्येनंतर सोनम रघुवंशी ज्या सीक्रेट फ्लॅटमध्ये राहत होती, तो इंदूरमधील लासुडिया परिसरातील हिराबाग कॉलनीत सापडला आहे. विशाल नावाच्या एका तरुणाने या फ्लॅटसाठी ५०,००० रुपये भाडे दिले होते, त्यानंतर सोनम ३० मे रोजी येथे राहण्यासाठी आली होती. पोलिसांनी आता या फ्लॅटला कुलूप लावले असून, या नव्या माहितीमुळे राजा हत्याकांडात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
२३ मे रोजी राजाच्या हत्येनंतर सोनम मेघालय पोलिसांना चकमा देत वेगवेगळ्या मार्गांनी इंदूरला परतली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ती ७ जूनपर्यंत या सीक्रेट फ्लॅटमध्ये राहिली. या काळात राजाही तिला गुप्तपणे भेटण्यासाठी येत होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोनम आणि राजाने या घरात बराच काळ राहण्याची योजना आखली होती. कारण, त्यांनी या घरात ५,००० रुपयांच्या घरगुती वस्तू खरेदी केल्या होत्या.
बाहेरही पडली नाही सोनम!
सोनम या १४ दिवसांच्या काळात फ्लॅटमधून बाहेरही पडली नाही. ती बंद खोलीत टीव्हीवर राजाशी संबंधित प्रत्येक बातम्या पाहत होती आणि सगळ्या अपडेट घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुशवाह याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ऑनलाइन ऑर्डर देऊन सोनमसाठी एका महिन्याचे रेशन फ्लॅटवर पाठवले होते.
पोलिसांनी 'असा' घेतला शोध!
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन अधिकारी नियुक्त केले होते, जे स्थानिक लोकांना राजा आणि सोनमचे फोटो दाखवून त्यांचा फ्लॅट शोधण्याचा प्रयत्न करत होते. अथक प्रयत्नांनंतर आता त्यांना सोनमचा हा सीक्रेट फ्लॅट सापडला आहे. या फ्लॅटमधील वस्तू आणि मिळालेल्या माहितीमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.