Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:50 IST2025-06-09T18:50:39+5:302025-06-09T18:50:54+5:30
सोनमच्या भावाने म्हटले की, जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. बहीण सोनम गाजीपूरला कशी पोहोचली, हे आपल्याला माहीत नसल्याचे देखील त्याने म्हटले.

Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
मेघालयात बेपत्ता झालेल्या इंदूरच्या हनिमून कपलच्या प्रकरणाला सोमवारी सकाळी एक नवीन वळण मिळाले. या जोडीतील बेपत्ता मुलगी सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये सापडली. तिने स्वतः तिच्या कुटुंबियांना फोन करून ती गाजीपूरमधील एका चहाच्या टपरीवर असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी सोनमला गाझीपूरमधील वन स्टॉप सेंटरमध्ये नेले. संपूर्ण प्रकरण मेघालयशी संबंधित असल्याने, तिथल्या पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
काय म्हणाला गोविंद?
मेघालयहून आल्यावर सोनमला पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. याआधी सोनमचा भाऊ गोविंद त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी इंदूरहून गाजीपूरच्या वन स्टॉप सेंटरवर पोहोचला आहे. सोनमचा भाऊ दिसताच मीडियाने त्याच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला. यावर मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना तो म्हणाला की, "माझी बहीण निर्दोष आहे. पण, जर ती दोषी असेल तर, तिला फाशी देण्यात यावी."
सोनमच्या भावाने म्हटले की, जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. बहीण सोनम गाजीपूरला कशी पोहोचली, हे आपल्याला माहीत नसल्याचे देखील त्याने म्हटले. त्याने मीडियाला विनंती केली की, त्याला आधी त्याच्या बहिणीला भेटण्याची परवानगी द्यावी. सोनमवर होणाऱ्या आरोपांबद्दल आपल्या काहीच माहीत नसल्याचे त्याने म्हटले.
गोविंद म्हणाला की, "मी दूरचा प्रवास करून आलो आहे. मला काहीच माहिती नाही. जर, सोनमची चूक असेल तर तिला फाशी दिली पाहिजे. पण, मला आधी सोनमला भेटू द्या."
आमची मुलगी निर्दोष!
दुसरीकडे, सोनमची आईने म्हणाली की, "आमची मुलगी सापडल्यानंतर आम्हाला फारसा आनंद झालेला नाही. जावयाच्या मृत्यूच्या बातमीने आम्ही आधीच दुःखी आहोत. आता आम्हाला आमची मुलगी सापडली आहे, त्यामुळे सत्य बाहेर येईल. काय घडले याबद्दल आम्ही आत्ता काहीच सांगू शकत नाही. आम्ही आमच्या मुलीला अद्याप भेटलेलो नाही. सध्या, आम्ही पोलीस काय म्हणत आहेत तेच ऐकत आहोत. आम्हाला आमच्या मुलीशी बोलल्यानंतरच काय घडलं हे कळेल."
सध्या गाझीपूर पोलीस मेघालय पोलिसांची वाट पाहत आहेत. ते येताच सोनमला त्यांच्या ताब्यात दिले जाईल. गाझीपूर पोलिसांनी अद्याप सोनमची चौकशी केलेली नाही, परंतु सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, सोनमने चौकशी दरम्यान आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपले अपहरण झाले होते, असा दावा देखील तिने केला.