Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:53 IST2025-06-10T13:48:17+5:302025-06-10T13:53:41+5:30

Sonam Raghuvanshi Case : सध्या सोनम रघुवंशी पोलीस कोठडीत असून, तिच्या कबुलीने हत्येच्या प्रकरणात नवे वळण आले आहे.

Sonam Raghuvanshi: The guide she refused became a big witness! How did Sonam's brass get exposed? | Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?

Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?

मेघालयात घडलेल्या राजा रघुवंशी हत्येचा उलगडा करत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तपासातून हे समोर आले आहे की, राजा रघुवंशीच्या हत्येचा कट कुण्या बाहेरील व्यक्तीने नव्हे, तर त्याच्या पत्नी सोनम रघुवंशीनेच रचला होता. या कटामध्ये तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याचे साथीदार सामील होते. सध्या सोनम रघुवंशी पोलीस कोठडीत असून, तिच्या कबुलीने हत्येच्या प्रकरणात नवे वळण आले आहे.

बेपत्ता जोडपं आणि एक संशयास्पद मृत्यू
२३ मे रोजी सोनम आणि राजा दोघेही खासी हिल्स परिसरातून अचानक बेपत्ता झाले. या घटनेनंतर अनेक दिवस दोघांचाही काही पत्ता लागत नव्हता. मात्र, २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खोल खड्ड्यात आढळून आला आणि प्रकरण गंभीर बनलं. सोनम अद्याप गायबच होती, ज्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई तिच्यावर वळू लागली.

तपासाला मिळालं महत्त्वाचं वळण
मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना, नोंगरियाट गावातील एका स्थानिक गाईड अल्बर्ट पीडी याची माहिती घेतली. त्याने उघड केलं की, सोनम आणि राजा या भागात आले होते आणि त्यांच्यासोबत तीन अनोळखी तरुण देखील होते. हे तिघे हिंदी बोलत असल्यामुळे पोलिसांचा संशय दाटला, कारण स्थानिक लोक प्रामुख्याने खासी भाषा किंवा इंग्रजी वापरतात.

हत्येसाठी बाहेरील लोकांचा सहभाग
पोलिसांना घटनास्थळी सापडलेला चाकू देखील संशयास्पद होता. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे शस्त्र स्थानिक परिसरात वापरले जात नाही. त्यामुळे हल्लेखोर हे मेघालयाबाहेरचे असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. पुढील तपासादरम्यान सोनमचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता, तिने हत्येच्या काही दिवस आधी एका आरोपीशी नियमित संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.

सोनमचे आत्मसमर्पण
सर्व आरोपींना हळूहळू अटक करण्यात आल्यानंतर, शेवटी सोनमनेही आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतः आपल्या कुटुंबाला फोन करून आपले ठिकाण सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिला गाझीपूरमधील काशी नावाच्या एका ढाब्यातून ताब्यात घेतलं.

पुढील तपास सुरू
सोनम सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या इतर आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या मते, ही हत्या पूर्णपणे नियोजनबद्ध होती आणि त्यामागे व्यक्तिगत संबंध व सूडभावना होती.

Web Title: Sonam Raghuvanshi: The guide she refused became a big witness! How did Sonam's brass get exposed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.