"माझा मुलगा बुडतोय, त्याला बाहेर काढा"; गुजरात पूल दुर्घटनेत अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 21:17 IST2025-07-09T21:14:33+5:302025-07-09T21:17:15+5:30
गुजरातमध्ये पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

"माझा मुलगा बुडतोय, त्याला बाहेर काढा"; गुजरात पूल दुर्घटनेत अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईचा आक्रोश
Gujarat Bridge Collapse: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी सकाळी पुलाचा एक भाग कोसळल्याने अनेक वाहने नदीत पडली. गुजरात पूल दुर्घटनेत अनेक लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. त्यांच्यावर काय संकट ओढावलं असेल हे फक्त तेच समजू शकतात, आपण फक्त कल्पना करू शकतो. गुजरातमध्ये पुलाचा भाग कोसळून एका मुलासह १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ही महिला आक्रोश होती.
गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवरील पूल बुधवारी सकाळी कोसळला. अपघात झाला तेव्हा पुलावरुन वाहने जात होती. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या पुलाच्या टोकाला एक टँकर अडकला होता. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. दोन जण बेपत्ता आहेत. ४५ वर्षे जुना हा पूल दक्षिण गुजरातला सौराष्ट्रशी जोडत होता. या भीषण घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये कंबरेभर पाण्यात उभी राहून गाडीत अडकलेल्या तिच्या मुलाला वाचवण्यासाठी ओरडून मदत मागत होती.
"माझा मुलगा बुडेल, कोणीतरी कृपया त्याला वाचवा," असं ती आई ओरडत होती. पाण्यात उभी राहून तिच्या मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती. तिचा मुलगा गाडीत अडकला होता. त्या आईच्या ओरडण्या ऐकून लोकांच्याही डोळ्यात अश्रू आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.
बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास, वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल अचानक कोसळला. अपघाताच्या वेळी पुलावर प्रचंड वाहतूक होती आणि दोन ट्रक, एक पिकअप व्हॅन, एक इको कार आणि एक ऑटो रिक्षा ही वाहने महिसागर नदीत पडली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, पूल कोसळताच मोठा आवाज आला आणि काही क्षणातच मोठ्याने आरडाओरडा सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, अपघातानंतर लगेचच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवले. "आम्ही सकाळपासून बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी एक मूल आहे आणि एक मूल बेपत्ता आहे. या काळात आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ४५ वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळवण्यात आले आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली," असं मदतकार्य करणाऱ्या एका तरुणाने सांगितले. या अपघातासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोकांचा आहे.