सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:14 IST2025-09-13T19:13:45+5:302025-09-13T19:14:31+5:30
एका जावयाने पत्नीच्या माहेरी जाण्याच्या रागातून आपल्या सासऱ्यावर गोळी झाडली, तर या हल्ल्यात सासऱ्याचा मोठा भाऊ थोडक्यात बचावला. मात्र...

AI Generated Image
कौटुंबिक कलहातून गुन्हेगारीचे टोक गाठणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात घडली आहे. इथे एका जावयाने पत्नीच्या माहेरी जाण्याच्या रागातून आपल्या सासऱ्यावर गोळी झाडली, तर या हल्ल्यात सासऱ्याचा मोठा भाऊ थोडक्यात बचावला. मात्र, या हल्ल्यानंतर पळण्याचा प्रयत्न करताना आरोपी स्वतःच पुराच्या पाण्यात अडकला, आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
ही घटना जिल्ह्यातील दुंदेमई गावात घडली. स्थानिक रहिवासी मायाराम हे दुपारी कंपिल येथील एका मंदिराच्या जवळ बसले होते, तेव्हा त्यांचा जावई सुनील तिथे आला. सुनील आणि त्याच्या सासरच्या मंडळींमध्ये काही जुन्या कौटुंबिक वादातून बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या सुनीलने सोबत आणलेल्या देशी कट्ट्याने मायाराम यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने, मायाराम यांना ती गोळी लागली नाही आणि ते बचावले.
त्यानंतर सुनीलने पुन्हा गोळी झाडण्यासाठी कट्टा रोखला, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे गोंधळात पडलेल्या सुनीलने पळ काढला. पळत असताना त्याने आपले सासरे, रक्षपाल, यांना गाठले आणि त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने रक्षपाल गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी लोहिया रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
जावई पुराच्या पाण्यात अडकला!
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी तातडीने शोधमोहीम सुरू केली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला चहुबाजूंनी घेराव घातला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी जवळच्याच पुराच्या पाण्यात उतरला. त्याला वाटले की, तो सहज पोहून पळून जाईल. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तेव्हा त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनीच धाव घेतली. गावकऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
हल्ल्यामागचे कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनीलचे लग्न चार वर्षांपूर्वी रक्षपाल यांची मुलगी प्रियंका हिच्यासोबत झाले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनात सतत वाद होत असल्याने प्रियंका काही काळापासून आपल्या माहेरी परतली होती आणि ती तिच्या काकांकडे राहत होती. याच गोष्टीचा जावयाला राग होता. याच रागातून त्याने सासरच्या लोकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.