तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 20:42 IST2025-12-29T20:41:53+5:302025-12-29T20:42:09+5:30
Tamil Nadu Crime News: तब्बल तीन कोटी रुपयांची विम्याची रक्कम आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने भयंकर कट रचून वडिलांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यात घडली आहे.

तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
तब्बल तीन कोटी रुपयांची विम्याची रक्कम आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने भयंकर कट रचून वडिलांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीचा झालेला मृत्यू हा सुरुवातीला अपघात वाटला होता. मात्र नंतर हा सुनियोजित हत्येचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलासह सहा जणांना अटक केली आहे. विम्याची रक्कम आणि सरकारी नोकीर मिळवण्यासाठी त्यांनी सर्पदंश करवून वडिलांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
ही घटना २२ ऑक्टोबर रोजी तिरुवल्लूरजवळील पोथथुरपेट्टई परिसरात घडली होती. मृत व्यक्तीची ओळख गणेश म्हणून पटली होती. ते एका सरकारी संस्थेमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होते. रात्रीच्या वेळी झोपलेले असताना गणेशन यांचा रात्री झोपलेले असताना मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या गळ्यावर सर्पदंशाच्या खुणा आढळून आल्या होत्या. सुरुवातीला ही एक सामान्य घटना असल्याचे वाटत होते. मात्र विमा कंपन्यांनी तपासादरम्यान ही घटना संशयास्पद असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनाही संशय आला. पोलीस तपासामध्ये गणेश यांनी एकूण ११ विमा पॉलिसी घेतल्या होत्या. तसेच त्याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये होती, अशी माहिती समोर आली.
दरम्यान, मृत्यूपूर्वी काही दिवस आधी गणेश यांना एक अपघात झाला होता, अशीही माहिती तपासामधून समोर आली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड करून तपास केला. त्यामध्ये गणेश यांचे मुलगे आणि इतर आरोपींमध्ये झालेल्या संभाषणाचे पुरावे मिळाले. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारावर पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मृताच्या दोन मुलांचाही समावेश आहे.