कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:38 IST2025-11-15T14:37:40+5:302025-11-15T14:38:02+5:30
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला.

कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
काल लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी एनडीएने निर्विवाद विजय मिळवला. एनडीएतील सर्व घटक पक्षांनी मिळून २४३ पैकी तब्बल २०२ जागा जिंकल्या. तर महाआघाडीला ४० जागाही जिंकता आल्या नाहीत. एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला. यातील काही प्रमुख लढती पुढील प्रमाणे.
बिहारमधील संदेश विधानसभा मतदारसंघात अगदी थोड्या फरकाने निकाल लागला. येथे जेडीयूचे उमेदवार रामचरण साह यांनी केवळ २७ मतांनी विजय मिळवला. साह यांना ८० हजार ५९८ मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आरजेडीचे दीपू सिंह यांना ८० हजार ५७१ मतं मिळाली. येथील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार राजीव रंजन राज यांना ६०४० मतं मिळाली.
अगिआंव मतदारसंघातही अगदी माफक फरकाने जय पराजचा निर्णय झाला. येथे भाजपाचे उमेदवार महेश पासवान यांनी केवळ ९५ मतांनी बाजी मारली. त्यांनी सीपीआय माले पक्षाचे उमेदवार शिव रंजन यांना पराभूत केले.
बलरामपूर मतदारसंघातही अटीतटीची लढत झाली. येथे एलजेपीआर पक्षाच्या संगीता देवी यांनी अवघ्या ३८९ मतांनी बाजी मारली. संगीता देवी यांनी एमआयएमचे उमेदवार मोहम्मद आदिल हुसेन यांना पराभूत केले. तर बख्तियारपूर मतदारसंघात एलजेपीआर पक्षाचे उमेदवार अरुण कुमार हे ९८१ मतांनी विजयी झाले. त्यांनी आरजेडीचे उमेदवार अनिरुद्ध कुमार यांना पराभूत केले.
बोधगया विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे उमेदवार कुमार सर्वजित हे ८८१ मतांनी विजयी झाले. त्यांनी एलजेपीचे उमेदवार श्यामदेव पासवान यांना पराभूत केले. तर चनपटिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिषेक रंजन यांनी ६०२ मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार उमाकांत सिंह यांना पराभूत केले. तर ढाका मतदारसंघात आरजेडीचे उमेदवार फैसल रहमान यांनी १७८ मतांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या पवनकुमार जैसवाल यांचा पराभव केला. याशिवाय फारबिसगंज मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मनोज विश्वास यांनी २२१ मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या विद्या सागर केशरी यांना पराभूत केले.