'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 11:35 IST2025-05-25T11:34:08+5:302025-05-25T11:35:46+5:30
काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या.

'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका
जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेले आणि अलीकडेच पाकिस्तानविरोधात पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले बीएसएफ जवान राजू कुमार (वय २९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. ही घटना वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहदुल्लापूर चक फरीद मधुरापूर गावात घडली.
काकांच्या श्राद्धासाठी आलेल्या जवानाला काळाने हेरलं
राजू कुमार यांचे काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कायदेशीर कारवाईनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
एकुलता एक मुलगा देशसेवेसाठी पाठवला!
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कुमार २०२२ पासून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. त्यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. राजू कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. राजू लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव ब्रजनंदन राय (५५) असून, भावानंतर आता मुलगाही गमावल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
पत्नी आणि दोन मुलांचा आधार हरपला
राजू कुमार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. जवानाच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. सैनिकाच्या शेवटच्या दर्शनासाठी गावात हजारोंची गर्दी झाली होती.