जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:30 AM2023-12-25T05:30:54+5:302023-12-25T05:31:37+5:30

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बोलावले; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच दिला होता निधी.

sold land and donated 1 crore for the ram mandir temple invitation to first donor | जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण

जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी दान देणाऱ्या पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असलेल्या सियाराम यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच श्रीराम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. ते आता मंदिराच्या बांधकामासाठीचे पहिले देणगीदार म्हणून ओळखले जातात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता सियाराम गुप्ता यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी १ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काशी प्रांताला दिली होती. त्यांच्या नोंदीनुसार ते पहिले देणगीदार ठरले आहेत.

अशी केली पैशांची उभारणी...

श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांची देणगी देणार असल्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यासाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी आपली १६ बिघे जमीन विकली होती. मात्र, पुरेसे पैसे न जमल्याने त्यांनी नातेवाइकांकडून १५ लाख रुपये उसने घेतले. अशाप्रकारे, त्यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी १ कोटी रुपये दान केले, असे सांगण्यात आले. 

मंदिर बांधले, तिथेच राहून प्रार्थना...

२२ जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, त्याआधी सियाराम गुप्ता यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सियाराम गुप्ता हे श्रीरामाचे निस्सीम भक्त आहेत. प्रतापगडमधील प्रयागराज रोडवर त्यांनी मंदिर बांधले असून ते तेथेच राहून प्रार्थना करतात.

देणगीचा प्रचार नाही...

राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एका वर्षानंतर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी आला. यानंतर सियाराम गुप्ता हे देणगीबाबत विसरूनही गेले आणि त्याची प्रसिद्धीही केली नाही. देणगीचा प्रचार करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले.

निमंत्रितांमध्ये कोण? 

२२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ७ हजारांहून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये जुने कारसेवक, व्यापारी, नेते, पत्रकार आणि मान्यवरांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सहभागी होणार आहेत.

 

 

Web Title: sold land and donated 1 crore for the ram mandir temple invitation to first donor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.