... म्हणून 'पवार-मोदी' भेट होतेय, संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:09 AM2019-11-20T10:09:14+5:302019-11-20T10:09:30+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आजही सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका

... So Sharad Pawar and narendra Modi was meeting, Sanjay Raut told in delhi | ... म्हणून 'पवार-मोदी' भेट होतेय, संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

... म्हणून 'पवार-मोदी' भेट होतेय, संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

Next

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे केंद्र आता दिल्लीकडे सरकले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खलबते सुरूच आहेत. यापासून शिवसेना अद्याप लांब आहे. दिल्लीत आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या भेटीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार हे आमच्या सांगण्यावरुनच मोदींना भेटणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आजही सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच, 1 डिसेंबरपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच, शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीवरही त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत या बैठका मुंबईत होत होत्या. मात्र, लोकसभेच्या अधिवेशनामुळे दोन्ही पक्षांचे नेते दिल्लीत आहेत. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. कारण पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार आहेत. यातच पवार यांनी संभ्रमात टाकणारी वक्तव्ये केल्याने नवे राजकीय समीकरण उदयास येते का, हे स्पष्ट होईल. पण, तत्पूर्वीच संजय राऊत यांनी पवार-मोदी भेटीचं कारण सांगितलंय. 

शरद पवारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असून देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सध्याची स्थिती गंभीर आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे शरद पवार हे राज्यातील सर्वच पक्षांचा पुढाकार घेऊन मोदींना भेटणार आहेत. मी स्वत: पवार यांना भेटून पंतप्रधान मोदींना भेटण्याची विनंती केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती पंतप्रधानांना सांगण्याचं आम्ही शिवसेनेच्यावतीने पवारांना म्हटलं होतं, असंही संजय राऊत यांनी सांगितंल. त्यामुळे, या भेटीचा राजकीय अर्थ लावू नये, असेही राऊत म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांसाठी शिवसेना कुणालाही भेटू शकते, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचं कारण हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थितीच आणि अतिवृष्टी हेच असल्याचं स्पष्ट केलंय. 

दरम्यान, पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची स्तुती खुद्द मोदींनीच राज्यसभेत केली होती. पवार-मोदी सख्य सर्वांनाच माहिती आहे. 2014 मध्ये पवारांनीच फडणवीस सरकारला मूक पाठिंबा दिला होता. आता उघडपणे पाठिंबा देण्याच्या विचारात पवार नाहीत ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. आज दुपारी 12 वाजता पवार मोदींना भेटणार आहेत. 

Web Title: ... So Sharad Pawar and narendra Modi was meeting, Sanjay Raut told in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.