कर्नाटकातील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:39 IST2025-11-08T18:39:01+5:302025-11-08T18:39:24+5:30
बेळगाव : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यात हिंसक वळण लागले. ...

कर्नाटकातील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी
बेळगाव : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यात हिंसक वळण लागले. हत्तरगी टोलनाका येथे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांसह महामार्गावरील वाहनांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सहा पोलिस जखमी झाले. सध्या परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऊसदराच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील गुरलापूर येथे गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. हत्तरगी टोलनाका येथे सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी हत्तरगी टोल नाका येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली.
महामार्ग रोखला जाण्याबरोबरच निदर्शनांची तीव्रता वाढू लागल्याने, तसेच पोलिसांनी वारंवार विनंती करूनही शेतकरी मागे हटण्यास तयार न झाल्यामुळे, अखेर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच संयम सुटलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी तत्काळ पोलिसांवर आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील दिसेल त्या खासगी व सार्वजनिक वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या हिंसक घटनेमुळे बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील बसवाहतुकीला मोठा फटका बसला. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले तरी, सध्या हत्तरगी टोल नाका परिसरात अत्यंत तणावग्रस्त वातावरण आहे.
राष्ट्रीय महामार्गही रोखणार... : चुन्नप्पा पुजारी
सरकारने त्वरित ऊसदराबाबत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल, तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांनी स्पष्ट केले. ‘सरकारने त्वरित ऊसदराबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल; तसेच राष्ट्रीय महामार्गही रोखून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,’ असा निर्वाणीचा इशारा चुन्नप्पा पुजारी यांनी दिला.
हत्तरगी टोलनाक्यावर दगडफेक; सहा पोलिस जखमी : डॉ. भीमाशंकर गुळेद
यमकनमर्डी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील हत्तरगी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, काही पोलिस वाहनांचेही नुकसान झाले आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.