पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:21 IST2025-11-20T18:20:51+5:302025-11-20T18:21:38+5:30
West Bengal SIR: आताची यादी २००२ च्या मतदार यादीशी पडताळली जात आहे. ज्या लोकांची नावे गायब झाली आहेत, त्यांच्याकडे आवश्यक असलेले आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र आणि जमिनीचे कागदपत्रे सर्व काही वैध आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रियेला विरोध होत असतानाच एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाचे नाव यादीतून वगळल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच हुगळी जिल्ह्यातून एक गंभीर त्रुटी समोर आली आहे. जिल्ह्यातील बलागढ भागातील पोतागाछी गावात सुमारे ९०० लोकांची नावे २००२ च्या मतदार यादीतून रहस्यमयरित्या गायब झाल्याचे आढळले आहे.
या गंभीर गैरव्यवस्थेमुळे निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जिल्हा प्रशासनाला बूथ स्तरीय अधिकारी नियमांनुसार काम करत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
२००२ च्या यादीत गोंधळ
आताची यादी २००२ च्या मतदार यादीशी पडताळली जात आहे. ज्या लोकांची नावे गायब झाली आहेत, त्यांच्याकडे आवश्यक असलेले आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र आणि जमिनीचे कागदपत्रे सर्व काही वैध आहेत. विशेष म्हणजे, या मतदारांनी २००२ पूर्वी मतदान केले आहे आणि त्यांची नावे २००३ च्या मतदार यादीत देखील उपस्थित आहेत. केवळ २००२ च्या यादीतून ही नावे कशी वगळली गेली, याबाबत जिल्हा प्रशासन सखोल चौकशी करत आहे.
राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या उप निवडणूक आयुक्त ज्ञानेश भारती यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने या प्रकाराची नोंद घेतली. त्यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना BLOs च्या कामावर लक्ष ठेवण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.