Sidhu Moosewala: भगवंत मान यांचा मोठा निर्णय, सिद्धू मुसेवाला यांच्या नावावर कँसर हॉस्पिटल आणि स्टेडियम उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:07 IST2022-06-03T16:07:31+5:302022-06-03T16:07:37+5:30
Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवालांची रविवारी हत्या करण्यात आली, त्यानंतर आज मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुसेवालांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Sidhu Moosewala: भगवंत मान यांचा मोठा निर्णय, सिद्धू मुसेवाला यांच्या नावावर कँसर हॉस्पिटल आणि स्टेडियम उभारणार
Sidhu Moosewala: काही दिवसांपूर्वी पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पंजाब सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सिद्धू मूसेवाला यांच्या नावाने कॅन्सर हॉस्पिटल आणि स्टेडियम बांधण्याची घोषणा मान यांनी केली आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. रविवारी मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांचे कुटुंबीय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय एजन्सीकडे सातत्याने मागणी करत आहेत. मुसेवाला यांच्या हत्येपासून त्यांचे कुटुंबीय भगवंत मान आणि त्यांच्या सरकारवर नाराज आहेत. हत्येच्या एक दिवस आधीच सिद्धू मुसेवालाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती.
कुटुंबीयांचा सरकारवर आरोप
मुख्यमंत्री भगवंत मान मुसेवाला यांच्या मुसा गावात पोहोचेपर्यंत तणावाचे वातावरण होते. मुसा गावातील लोक भगवंत मान यांच्या सरकारवर नाराज आहेत. गावात सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. सरकारने सुरक्षा काढून घेतल्यामुळेच सिद्धू यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. मात्र, या तीव्र विरोधादरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात भगवंत मान यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
विरोधकांचा दबाव
यावेळी भगवंत मान यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. भगवंत मान यांच्या सरकारने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची शिफारस आधीच केली आहे. या प्रकरणानंतर मान सरकारवर विरोधकही दबाव टाकत आहेत.